Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत सध्या काव्या-पार्थ आणि नंदिनी-जीवा या विरुद्ध जोडप्यांची लग्न झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. भर मांडवात जीवाने साथ दिल्यामुळे नंदिनी हे लग्न निभावण्याचा निर्णय घेते. कारण, तिला काव्या-जीवाच्या अफेअरविषयी काहीच माहिती नसतं. एकीकडे नंदिनी लग्नाबद्दल समजूतदारपणा दाखवत असताना दुसरीकडे, काव्याच्या बाबतीत नेमकं उलटं घडतं.

काव्या-जीवा एकमेकांना आधीपासून डेट करत असतात. त्यामुळे आपल्या मोठ्या बहिणीने म्हणजेच नंदिनीने जीवाबरोबर संसार थाटणं काव्याला पटत नसतं. पण, आपल्या मनातलं दु:ख ती कोणासमोरच व्यक्त करू शकत नसते. याशिवाय जीवाने देखील काव्याला आपल्यातलं नातं इथून पुढे संपलं असं सांगितलेलं असतं. शेवटी माहेरी गेल्यावर काव्या आपला सगळा राग व्यक्त करते.

काव्याची आई शारदाला कपाटात जीवा अन् काव्याची प्रेमपत्रं, हृदयाच्या आकारातील लॉकेट या वस्तू सापडतात. यानंतर काव्या तिच्या प्रेमाची आईसमोर कबुली देते. हे सगळं ऐकून शारदाला धक्का बसतो. शेवटी दोघीही जीवा-पार्थबरोबर सासरी पुन्हा परत येतात.

काव्या आणि नंदिनीला सासरी सासूपेक्षा वसुंधरा आत्यांचा जाच सहन करावा लागत असतो. पण, आता येत्या भागात काव्या सडेतोड उत्तर देऊन वसुंधराची बोलती बंद करणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. मनाविरुद्ध लग्न झाल्यावर काव्या आणि नंदिनी या दोन बहि‍णींच्या नात्यात दुरावा आलेला असतो. पण, वसुंधरा आत्या आपल्या बहिणीचा अपमान करत आहेत, हे पाहून काव्या पुढे सरसावते आणि आत्याला खडेबोल सुनावते.

नंदिनी तिच्या आईने दिलेल्या भेटवस्तू सर्वांना देत असते. ती सर्वप्रथम तिच्या सासूला गिफ्ट देते. यानंतर नंदिनी वसु आत्याजवळ गिफ्ट द्यायला जाते. तेव्हा आत्या तिच्यावर चिडून म्हणते, “लाज नाही वाटत…खरंतर एवढ्या बदनामीनंतर तुझ्याजागी दुसरी कोणी असती ना…तर, तिने आत्महत्या केली असती.”

बहिणीचा होणारा अपमान काव्याला बघवत नाही ती लगेच नंदिनीच्या समोर खंबीरपणे उभी राहते आणि वसु आत्याला संतापून म्हणते, “तुमच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर, तिलाही सांगितलं असतं का आत्महत्या करायला…?” काव्याचं हे रुप पाहून वसुंधरा तिला सांगते, “माझ्याशी तोंड सांभाळून बोल” पण, काव्या एक अक्षरही न ऐकता, “तुम्ही तोंड सांभाळून बोला” असं आत्याला खडसावून सांगते. काव्याचं हे रौद्ररुप पाहून सगळेच शांत होतात.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा हा जबरदस्त भाग २० मार्चला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “एक नंबर काव्या”, “बहीण असावी तर अशी”, “बहिणीची बाजू एका बहिणीने घेतलीये भारी वाटलं”, “मालिका खूप छान आहे फक्त बहिणींमध्ये फूट नका दाखवू हा प्रोमो सुंदर होता”, “काव्याने बरोबर उत्तर दिलंय मस्तच”, “खऱ्या आयुष्यात काव्यासारखं असावं” अशा प्रतिक्रया नेटकऱ्यांनी कमेंट्मध्ये दिल्या आहेत.

Story img Loader