Lagnanantar Hoilach Prem : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका सध्या घराघरांत चांगलीच चर्चेत आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे या मालिकेत नुकताच आलेला ट्विस्ट. खरंतर, मालिकेचं कथानक काय असणार याचा अंदाज पहिला टीझर पाहून आधीपासूनच सर्वांना होता. मात्र, आता प्रत्यक्ष तो सीक्वेन्स पाहताना सगळेजण चक्रावून गेले आहेत. पार्थ-नंदिनीचं ठरलेलं लग्न मोडतं. नंदिनीला ऐनवेळी लग्नमंडपातून किडनॅप केलं जातं. त्यानंतर बहीण पळून गेल्याचा ठपका ठेवत काव्याला पार्थबरोबर लग्न करण्यास भाग पाडलं जातं.
आई-बाबांच्या आदराखातर काव्या पार्थबरोबर लग्न करण्यास तयार होते. तिथे नंदिनीला गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. ऐनवेळी तिथे जीवा पोहोचतो आणि गुंडांच्या तावडीतून नंदिनीची सुटका करतो. नंदिनी आणि जीवा लग्नमंडपात पोहोचतात तोवर पार्थ-काव्या विवाहबंधनात अडकलेले असतात. सगळेजण नि:शब्द होतात. काव्या जीवाच्या आठवणीत फक्त रडत असते.
यानंतर मालिकेत आणखी एक ट्विस्ट येतो… नंदिनीवर देखील त्याच दिवशी लग्न करण्याचा दबाव टाकला जातो. यावेळी तिच्या बाजूने कोणीही ठामपणे उभं राहत नाही. पण, जीवा यावेळी तिला धीर देतो आणि सर्वांसमोर ‘मी नंदिनीचा स्वीकार करतोय’ असं सांगतो.
काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनी एकमेकांशी लग्न करतात. अर्थात या चौघांची लग्न एकमेकांच्या मनाविरुद्ध झालेली असतात. त्यामुळे काव्या आता आपण लवकरात लवकर घटस्फोट घेऊन या नात्यांमधून आपली सुटका करून घेऊ असा प्रस्ताव नंदिनीसमोर मांडते. पण, आता नंदिनी या गोष्टीला स्पष्ट शब्दांत नकार देणार आहे.
घटस्फोट का घेणार नाही? कारण आलं समोर…
नंदिनी म्हणते, “नाही! मी जीवाला घटस्फोट देणार नाही. जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता, तेव्हा फक्त जीवाने माझ्या डोक्यावर विश्वासाने हात ठेवला. त्यामुळे जीवा स्वत:हून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही.”
नंदिनीचा निर्णय ऐकून काव्याला धक्का बसतो. ती एकटक बहिणीकडे बघतच राहते. कारण, नंदिनीला काव्या-जीवाच्या आधीच्या नात्याविषयी काहीच माहिती नसतं. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा हा विशेष भाग ८ मार्चला प्रसारित करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत जवळपास ३ आठवडे सुरू असलेला लग्नाचा ट्रॅक अखेर संपला असल्याने नेटकऱ्यांनी या प्रोमोच्या कमेंट्समध्ये आनंद व्यक्त केला आहे.