Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी या जोड्यांची मनाविरुद्ध लग्न झालेली आहेत. खरंतर, जीवा आणि काव्या या दोघांचं एकमेकांवर मनपासून प्रेम असतं. पण, खलनायिकांनी खेळलेल्या मोठ्या डावामुळे पार्थचं काव्याशी लग्न होतं आणि परिणामी सामाजिक परिस्थितीमुळे जीवाला नंदिनीशी लग्न करणं भाग असतं.
मुलांची लग्न मनाविरुद्ध झाल्यामुळे सध्या देशमुखांच्या घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आत्याबाई वसुंधरा नेहमी काही ना काही कुरघोड्या करत असतात. त्यांच्या लेकीचं म्हणजेच रम्याचं पार्थशी लग्न व्हावं हा आत्याचा एकमेव उद्देश असतो. तर, पार्थ-जीवाची आई कायम सुनांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. “लग्नाला जरा वेळ द्या, गोष्टी आपोआप मार्गी लागतील” असं घरातील प्रत्येकाचं म्हणणं असतं. पण, मालिकेतील मोठा ट्विस्ट अद्याप समोर आलेला नाहीये.
जीवा आणि काव्याचं प्रेमप्रकरण अजूनपर्यंत कोणासमोरही उघड झालेलं नसतं. नंदिनीला सुद्धा याची कल्पना नसते. जीवाच्या छातीवर काव्याचं नाव देखील कोरलेलं असतं. आता या सगळ्या गोष्टी नंदिनीला समजल्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण, जीवाच्या आयुष्यात कोणती तरी मुलगी होती याची हिंट नंदिनीला त्याआधीच मिळणार आहे.
जीवाच्या कपाटात नंदिनीला ‘J लव्ह K’ असं नाव लिहिलेल्या काही भेटवस्तू सापडतात. या वस्तू पाहून नंदिनीला धक्का बसतो. तेवढ्यात जीवा खोलीत येतो. नंदिनीच्या हातात काव्याने दिलेल्या भेटवस्तू पाहून जीवा गोंधळून जातो. यावरून नंदिनी नवऱ्याला विचारते, “JK अशी नावं का लिहिली आहेत? ही K नावाची मुलगी तुमच्या आयुष्यात होती का?”
जीवा नंदिनीला ‘हो’ असं उत्तर देतो. पण, नंतर नंदिनीने त्या मुलीचं नाव विचारताच जीवा नि:शब्द होतो. दरम्यान ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा हा विशेष भाग २६ मार्चला प्रसारित करण्यात येणार आहे.
दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सोमवार ते रविवार सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे आणि विजय आंदळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहेत.