Lagnanantar Hoilach Prem : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत नंदिनी-जीवा आणि पार्थ-काव्या यांचं मनाविरुद्ध लग्न झालेलं आहे. तरीही, आई-बाबांच्या इच्छेखातर आणि कोणाचंही मन दुखावू नये म्हणून ही मंडळी संसाराला लागली आहेत. मात्र, लग्न झाल्यापासून नंदिनी आणि काव्याला सासरी सासूबाईंपेक्षा जास्त त्रास वसुंधरा आत्याने दिलेला आहे.

लग्न झाल्यापासून वसु आत्या आणि काव्या या दोघींमध्ये टोकाचे वाद झाल्याचं मालिकेत पाहायला मिळालं आहे. याशिवाय काव्याचं, वसु आत्याची लेक रम्याबरोबर सुद्धा वारंवार भांडण होत असतं. रम्या आणि वसुंधरा रोज काही ना काही नवीन प्लॅन आखून या दोन्ही बहिणींना विशेषत: काव्याला त्रास देत असतात. कारण, रम्याचं पार्थवर जीवापाड प्रेम असतं. काही करून काव्या आणि पार्थचा संसार मोडायचा हे रम्याचं ध्येय असतं.

एकीकडे, रम्याने पार्थ-काव्याचा संसार मोडण्याचा विडा उचललेला असतो. तर, दुसरीकडे नंदिनीने ‘काही झालं तरीही, तुला काव्याचा संसार मोडू देणार नाही’ अशी ताकीद रम्याला दिलेली असते. आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे.

काव्याचा स्वभाव फटखळ आणि रोखठोक आहे तर, तिची मोठी बहीण नंदिनी ( मृणाल दुसानिस ) प्रचंड शांत आणि संयमी स्वभावाची असते. सर्वांना सामावून घेत आनंदी राहून, न भांडता आपलं आयुष्य जगायचं असे विचार नंदिनीचे असतात. या साध्याभोळ्या नंदिनीचं मालिकेत पहिल्यांदाच रौद्ररुप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

रम्या काव्याचा फोन चेक करते. याचा जाब काव्या तिला सगळ्या घरासमोर विचारते. रम्या चिडून म्हणते, “हो काव्याचा फोन मी चेक केला. काव्याचं कोणाबरोबर लफडं चालू आहे हे बघण्यासाठी मी हे केलं. तुमच्या आई-वडिलांचे संसार बघण्यासाठी…” हे वाक्य ऐकताच नंदिनीचा राग अनावर होतो आणि ती रम्याला सणसणीत कानाखाली वाजवते.

नंदिनी म्हणते, “आल्यापासून सहन करतोय म्हणून माझ्या आई-वडिलांवर आणि माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर जायचं नाही. काव्यापासून चार हात लांबच राहायचं.” या जबरदस्त प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“हे अगदी योग्य दाखवलं, माणसाने शांत असावं पण, कुणाचे खोटे आरोप सहन करून घेऊ नयेत”, “एक नंबर नंदिनी”, “एक नंबर, अती करत होती असंच पाहिजे हिला”, “अजून २-३ मारायला पाहिजेत”, “शांत माणसाच्या नादाला लागू नये”, “खूपच मस्त आता नक्कीच ही रम्या चार हात लांब राहील” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेचा हा विशेष भाग ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. प्रेक्षक हा भाग पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.