Netizens Reacts On Promo of Lagnanantar Hoilach Prem: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका आता लोकप्रिय ठरत आहेत. पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या, रम्या ही आणि मालिकेतील इतर पात्रे घराघरांत पोहोचत आहेत. मालिकेत दिवसेंदिवस येणाऱ्या ट्विस्टमुळे पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढताना दिसत आहे.

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत आधी काय घडलं होतं?

काही दिवसांपूर्वीच पार्थ व नंदिनीचे लग्न ठरले होते. पण, ऐन लग्नावेळीच नंदिनीला किडनॅप करण्यात आले. पार्थचा लहान भाऊ जीवा नंदिनीला शोधण्यासाठी बाहेर पडला, तितक्यात गावकऱ्यांच्या दबावामुळे नंदिनीची लहान बहीण काव्या व पार्थचे लग्न लावून देण्यात आले. जीवा नंदनीला सुखरूप लग्नस्थळी घेऊन आला. तिथे आल्यानंतर त्यांना समजले की काव्या व पार्थचे लग्न झाले आहे. नंदिनी व जीवाला धक्का बसला.

काव्या व जीवाचे एकमेकांवर प्रेम होते, पण काव्याने स्वत:च्याच मोठ्या भावाबरोबर लग्न केले हे पाहून जीवाला वाईट वाटले. काव्याने या लग्नाला नकार दिला नाही, तिने त्याची वाट पाहिली नाही, म्हणून जीवाला राग आला. त्याच मांडवात नंदिनीने विचारले की तिला कोण स्वीकारेल, तेव्हा जीवा पुढे आला. त्याने तिच्याबरोबर लग्न करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर जीवा व नंदिनीचे लग्न झाले.

जीवा व नंदिनी यांनी लग्न केले आहे हे समजताच काव्याला धक्का बसला. तिने वेळोवेळी सर्वांना हे सांगितले की पार्थबरोबरचे तिचे हे लग्न तिला मान्य नाही. सर्वांचीच लग्ने ही दबावाखाली, मनाविरुद्ध झाली आहेत, त्यामुळे घटस्फोट घ्यावा आणि स्वतंत्र व्हावे. मात्र, या लग्नाला एक संधी द्यावी असा नंदिनीने विचार केला; तर पार्थनेदेखील त्याचे काव्याबरोबरचे लग्न स्वीकारल्याचे दिसत आहे, पण जीवाच्या मनात राग असल्याचे पाहायला मिळत आहे. काव्या सतत चिडचिड करताना दिसते. घरातील लोकांशी नीट वागत नसल्याचे पाहायला मिळते. आता या मालिकेच्या एका प्रोमोवर नेटकरी व्यक्त होताना दिसत आहेत.

काव्या-जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला संशय येणार?

स्टार प्रवाह वाहिनीने सोशल मीडियावर मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की काव्या, जीवा, नंदिनी, पार्थ एकत्र बसले आहेत. काव्या म्हणते, “मला रम्याचं कौतुक वाटतं, आपल्या प्रेमाची कबुली द्यायला हिंमत लागते”; जीवा रागाने तिच्याकडे बघत म्हणतो, “आपल्या प्रेमासाठी वाट बघायलाही हिंमत लागते”, तितक्यात नंदिनी म्हणते, “आपल्या प्रेमाचा हात सोडून समोर आलेल्या आयुष्याचा हात धरायला हिंमत लागते. यावर काव्या रागाने म्हणते, “जी व्यक्ती आपल्या प्रेमाचा हात सोडते ती व्यक्ती आयुष्यभर मन मारून जगते.” तिच्या या बोलण्यावर सगळेजण तिच्याकडे बघत असल्याचे दिसत आहे. यावर काव्या पुन्हा जीवाकडे बघत म्हणते, “गप्प का झालात? पटतंय ना?” हा प्रोमो शेअर करताना स्टार प्रवाह वाहिनीने, “जीवा-काव्याच्या ह्या संवादामुळे पार्थ-नंदिनीला संशय येईल का?”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकांनी या प्रोमोवर कंमेट्स केल्या आहेत. “जीवा जेव्हा काव्याला म्हणत होता की मंगळसूत्र काढ आणि लग्न मोड, तेव्हा काव्या नाही म्हणाली. पण, जेव्हा जीवाने नंदिनीशी लग्न केलं तेव्हा काव्याला धक्का बसला. म्हणजे तिने केलं ते योग्य आणि जीवाने केलं ते चुकीचं, अवघडच आहे.” “काव्याने समाजापेक्षा आई-वडिलांना महत्त्व दिलं होतं, त्यांचा मान राखायला हे लग्न केलं होतं. मग तिने हे नातं स्वीकारून पुढे पाऊल टाकायला हवंय. आत्ता एवढा त्रागा, राग राग करण्यापेक्षा तेव्हाच ठाम मताने लग्नाला नकार द्यायचा होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई-वडिलांपेक्षा इतर काहीही महत्त्वाचं असू शकत नाही. लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये, आज मांडला उद्या मोडला.”

“दोन महिन्यांपासून हिलाच एकटीला त्रास होतोय का? किती दिवस तिला चिडका बिब्बा दाखवणार? काही मर्यादा असते की नाही? जीवा गप्प बसू नकोस, तोंड उघड; आम्हालासुद्धा तेच तेच पाहण्याचा कंटाळा आलाय.” “काव्याचं इथे चुकलं, ती लहान आहे, नंदिनी बरोबर आहे”, “आपलं कोणावर प्रेम आहे हे सांगायलासुद्धा हिंमत लागते. ती हिंमत आधी आण आणि मग दुसऱ्यांना विचार”, अशा अनेक कमेंटस सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत; तर अनेकांनी आता जीवाने बोलणे गरजेचेच आहे, त्याला जास्त संवाद मिळायला पाहिजेत, असेही लिहिले आहे.

आता मालिकेत पुढे काय होणार? काव्या तिचे व जीवाचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगणार का? नंदिनी व पार्थला जीवा-काव्याच्या नात्याबद्दल समजणार का? मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.