सूर्या दादा त्याच्या लहान बहिणींची मोठ्या प्रेमाने काळजी घेतो. त्याच्या बहिणींची लग्न धुमधडाक्यात आणि चांगल्या घरात करणं हे त्याचं स्वप्न आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या धनुच्या लग्नाची घाईगडबड चालू आहे. सूर्या दादा व घरातील सर्व मंडळी हे लग्न उत्तम पद्धतीने पार पडावे यासाठी प्रत्येक गोष्टीची काळजी घेताना दिसत आहेत. धनुचे लग्न जीमसेना म्हणजेच दत्तूशी ठरले आहे. हे लग्न थाटामाटात करेन असे म्हणत सूर्याने दत्तूच्या आईला आश्वस्त केले आहे. आता ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो समोर आला, ज्यामध्ये सूर्याची आई घरी परतल्याचे समोर आले आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये पाहायला मिळते की सूर्याची आई म्हणजेच आशाची तुरुंगातून सुटका होते. दुसरीकडे धनु आईच्या आठवणीने भावूक झाली आहे. सूर्या तिला समजावत म्हणतो की, आपल्याकडे जे नाही तेच का पाहिजे असतं आपल्याला? जी व्यक्ती आपल्याला सोडून गेली, तिची आठवण काढून तुझे चांगले क्षण का खराब करतेस? आपलं एवढं मोठं कुटुंब आहे आणि तुळजा तुझी आईच आहे. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की छत्री डॅडींना सांगतो, “ती आशा पॅरोलवर तुरुंगातून सुटली आहे.” हे ऐकल्यानंतर डॅडींच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे भाव दिसत आहेत.
मायलेकाची भेट होणार
मालिकेचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये सूर्याची व त्याच्या आईची भेट झाल्याचे दिसत आहे. प्रोमोमध्ये दिसते की, सूर्या घराच्या दरवाज्याला तोरण बांधत आहे, त्यावेळी त्याच्या डोळ्यात काहीतरी जाते. तो तसाच डोळे बंद करून खाली उतरतो. सूर्याची आई त्याच्या डोळ्याला साडीच्या पदराने उब देते, तितक्यात त्याला कोणीतरी हाक मारते. सूर्या डोळे उघडतो तर समोर आईला बघून त्याला धक्का बसतो. तो आई असे आश्चर्याने म्हणताना दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सूर्या दादाला पुन्हा मिळू शकेल का ऊब मायेची?”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे सूर्याची आई आतापर्यंत तुरुंगात होती, मात्र त्याची कल्पना त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला नाही. ती पळून गेली असे म्हटले जात होते, त्यामुळे त्याच्या बहिणींचे लग्न ठरण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. आई अचानक का व कुठे सोडून गेली, असा प्रश्न सूर्याला अनेकदा पडला आहे. त्याच्या मनात आईविषयी रागही आहे. हे सगळे डॅडींनी घडवून आणल्याचे दिसत आहे. आता आई परतल्यानंतर त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? डॅडींचे सत्य सर्वांसमोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सूर्याच्या आईची भूमिका अभिनेत्री राजश्री निकम यांनी साकारली आहे.