‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada)मालिकेतील भाग्या, तेजू, धनू व राजश्री या बहिणी त्यांच्यातील प्रेमाने प्रेक्षकांची मने जिंकतात. या बहिणी त्यांच्या सूर्यादादावरही खूप प्रेम करीत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ही भावंडे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. सध्या मालिकेत धनुच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. धनु तिच्या आईच्या आठवणीने हळवीदेखील झाल्याचे पाहायला मिळाले. सूर्याची पत्नी तुळजा त्याच्या बहि‍णींना आईची उणीव भासू देत नाही. त्यांची आई त्यांच्या घरातून गेल्यापासून सूर्याने या घराची तसेच त्याच्या बहि‍णींची काळजी घेतली. आता त्यांची आई परत आली असून त्यांची भेट कधी होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता या सगळ्यात मालिकेत राजश्रीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री ईशा संजयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ईशा संजयने शेअर केला ऑनस्क्रीन बहि‍णींबरोबरचा व्हिडीओ

अभिनेत्री ईशा संजयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चार बहिणी मिळून स्वयंपाक करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही सगळ्यांसाठी जेवण बनवणार आहे. भेंडी, वांग्याचं भरीत, मेथीची भाजी असा बेत आहे आणि आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवणार आहे, असे राजश्री म्हणते. भाग्यश्री म्हणते, “लाखात एक आमचा दादाच्या सेटवर पहिल्यांदाच जेवण बनवतोय.” राजश्री म्हणते की या सगळ्यांना स्वयंपाक येतो. सगळेजण काम करत आहेत. पुढे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की धनु एका रूममध्ये बसली आहे. ती म्हणते की मला माझ्या बहि‍णींनी कामाला लावलं आहे. लसूण सोलत आहे आणि शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “जेव्हा एकमेकींपासून दूर जाण्याची वेळ आलीये तेव्हा एकमेकींच्या सहवासाची किंमत समजली. अंतर वाढू शकतं पण बहिणींमधील प्रेम असंच कायम राहिल. आमच्या आवडत्या आठवणींपैकी एक जवळची आठवण शेअर करत आहोत”, असे म्हणत अभिनेत्रीने हार्ट इमोजी शेअर केली आहे. ईशाच्या या व्हिडीओवर मालिकेत तेजूच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीने कोमल मोरेने ‘रडवलंस’ अशा आशयाची कमेंट केली आहे. तर धनूच्या भूमिकेत दिसणाऱ्या समृद्धीनेदेखील इमोजी शेअर केली. अनेक चाहत्यांनीदेखील या ऑनस्क्रीन बहि‍णींचे कौतुक केले आहे.

दरम्यान, या मालिकेतील सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ते त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.