‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat EK Aamcha Dada) या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी आहेत. सूर्याबरोबरच त्याच्या बहिणीसुद्धा प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतात. मालिकेबरोबरच हे कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. कधी विनोदी रील्सच्या माध्यमातून, डान्सच्या व्हिडीओमधून, तर कधी सेटवरील व्हिडीओमधून हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता मालिकेत तेजूची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल मोरे व शत्रूची भूमिका साकारणारा अभिनेता अतुल कुडले हे एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
कोमल मोरेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये कोमल मोरे व अतुल कुडले हे दोघे मिळून चहा बनवीत असल्याचे दिसत आहे. कोमलने चहा केल्यानंतर अतुलने तो कपामध्ये ओतल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने ऑन सेट दरवळ स्पेशल, अशी कॅप्शन दिली आहे. त्याबरोबरच या व्हिडीओला जोडलेले विशेष असे गाणे ऐकायला मिळत आहे.
अधोक्षज कऱ्हाडे काय म्हणाला?
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्याचे दिसत आहे. सर्वांनी या ऑनस्क्रीन जोडीचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्यात एक कमेंट लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत समीर ऊर्फ पिंट्याची भूमिका साकारणारा अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे याने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. “झाला का सासुरवास सुरू”, असे म्हणत अभिनेत्याने हसण्याची इमोजी शेअर केली आहे. त्यावर अतुलने हसण्याची इमोजी शेअर करीत त्याला प्रतिसाद दिला आहे. तर, कोमलने लिहिले, “काय सांगू आता तू पळून गेला नसतास, तर वेगळी गोष्टी घडली असती.” त्यावर अधोक्षजने, “मी पुन्हा येईन”, अशी कमेंट केली आहे.
अनेक चाहत्यांनीदेखील कोमलच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. “तेजूवाहिनी आणि शत्रूभैय्याचा प्रेमाचा चहा”, “तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. तुम्ही दोघं खरंच लग्न करा”, “तुम्ही दोघे खरंच खरे नवरा-बायको दिसत आहात. फक्त शत्रूचं वागणं, बोलणं, स्वभावात बदल करा.”
लाखात एक आमचा दादा या मालिकेत कोमल मोरे तेजू व अतुल कु़डले हे नवरा-बायकोच्या भूमिकांत दिसत आहेत. तेजू व शत्रू अशी त्यांच्या पात्रांची नावे आहेत. शत्रूला तेजूबरोबर लग्न करायचे होते म्हणून डॅडींनी समीर ऊर्फ पिंट्याला जेलमधून सोडवले. तेजूसाठी त्याचे स्थळ आणले. सूर्याच्या घरच्यांनी होकार दिल्यानंतर त्याला लग्नाच्या दिवशी पळून जायला भाग पाडले आणि मग शत्रूने त्याच मांडवात तेजूशी लग्न केले. लग्नानंतर मात्र तो तिचा छळ करताना दिसत आहे.
आता शत्रूचे हे वागणे तेजूच्या भावाला कळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.