नितीश चव्हाण हा अभिनेता ‘लागिरं झालं जी’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचला. आजही प्रेक्षक त्याला अनेकदा आज्या, फौजी असे संबोधताना दिसतात. या मालिकेतील त्याच्या अभिनयामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. सध्या अभिनेता ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत अभिनेत्याने सूर्या ही भूमिका साकारली आहे. सूर्या दादा आपल्या बहिणींसाठी हिरो आहे. तेजू, भाग्या, धनश्री व राजश्री या त्याच्या चार बहिणींवर त्याचे खूप प्रेम आहे. तो त्यांना आई-वडिलांची माया देतो. त्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतो. तसेच त्याची पत्नी तुळजा व त्याची जोडीसुद्धा प्रेक्षकांना आवडते. सूर्या दादाचे दोन जीवलग मित्र काजू व पुड्या हे नेहमी त्याच्या मदतीसाठी धावून येताना दिसतात. आता मात्र सूर्या, काजू व पुड्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आले आहेत.
‘लाखात एक आमचा दादा’मधील सूर्या, काजू व पुड्या चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ आहे. सूर्या, काजू व पुड्या यांनी ‘हवा हवा ये हवा’ या गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ नितीश चव्हाणने शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना “हवा हवा…आपलीच हवा” अशी कॅप्शन दिली आहे. तसेच स्वप्नील कणसे व महेश जाधव यांच्या अकाउंटला टॅग केले आहे. आता हा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडत असल्याचे दिसत आहे.
अनेक चाहत्यांनी या कलाकारांचे कौतुक केले आहे. एका चाहत्याने म्हटले, “दोस्तीपेक्षा जास्त काही नाही”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “तुमचीच हवा आहे सध्या सगळीकडे”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “वाह”, “झक्कास”, तसेच काहींनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. पारू मालिकेत अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातनेदेखील इमोजी शेअर करीत त्यांचे कौतुक केले आहे.
मालिकेतील हे व इतर कलाकार डान्स, विनोदी रील्स या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. सोशल मीडियावरील त्यांच्या व्हिडीओंना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळते. महेश जाधव व नितीश चव्हाण यांनी ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेआधी ‘लागिरं झालं जी’ मालिकेतसुद्धा एकत्र काम केले आहे.

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूर्याला शत्रूचे खरे रूप समजल्याचे पाहायला मिळाले. शत्रूने तेजूला कानाखाली मारल्याचे पाहताच सूर्याचा संताप अनावर झाला. त्यानेदेखील शत्रूला मारले. शत्रूच्या कृत्याबाबत त्याला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर डॅडींनी त्याची माफी मागत शत्रू पुन्हा असे करणार नाही, असे म्हणत आश्वस्त केले. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.