टीव्हीवर दिसणारे कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सोशल मीडियावर हे कलाकार त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. कधी सेटवरील व्हिडीओ, कधी कुटुंबाबरोबरचे गोड क्षण, तर अनेकदा रील्स, व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. त्यामुळे चाहते व कलाकारांचे नाते अधिक घट्ट होताना दिसते. कलाकारांच्या अनेक पोस्टवर चाहते कमेंट्स करत असतात. कधी हे चाहते आवडलेल्या पोस्टचे कौतुक, तर कधी ते ट्रोलही करताना दिसतात. काही वेळा मजेशीर कमेंट्स सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता ‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) फेम अभिनेता स्वप्नील पवारने सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे. ही विनोदी रील व त्यावर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
“पाहुणे बघायला आले होते…”
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सत्यजितची भूमिका साकारणारा अभिनेता स्वप्नील पवार त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे. स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सुरुवातीला तो शांत बसलेला आहे. काही वेळानंतर तो रडण्याचा अभिनय करताना दिसत आहे. या व्हिडीओवर लिहिलेल्या ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या ओळी अशा, “पाहुणे बघायला आले होते. त्यांनी विचारलं की, मुलगा काय करतो? मामा म्हणाला की, मुलगा अभिनेता आहे. मालिकेत काम करतो. मुलीची आत्या म्हणाली, कुठल्या मालिकेत काम केलंय?” अभिनेत्याने पुढे त्यावर रडण्याची इमोजी शेअऱ केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्यानं “संघर्ष खरा आहे”, अशी कॅप्शन लिहिली आहे.
स्वप्नील पवारने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “आत्याबरोबर मीसुद्धा विचारत आहे कुठल्या सीरियलमध्ये काम केलंय?”, दुसर्या नेटकऱ्याने लिहिले, “इतकं खरं बोलायचं नव्हतं”, असे म्हणत हसण्याची इमोजी शेअर केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “नाराज होण्याची गरज नाही. काही बायका मालिका बघतच नाहीत. जशी की मी, माझासुद्धा तोच प्रश्न आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सत्याची भूमिका बघ म्हण; दारात सोड फोनसुद्धा येणार नाही.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “लाख जणांच्या प्रयत्नात एक आत्या’ मालिकेचं नाव सांग बिनधास्त”, तर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
अनेक नेटकऱ्यांनी स्वप्नील पवारच्या कामाचे कौतुक केले आहे. “या कंटेटचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की, तू कोणत्या मालिकेत काम करतोस ते”, “लवकरच प्रमुख भूमिका मिळेल”, “भावा, तू मराठीच काय, हिंदीमध्येसुद्धा दिसणार, ओटीटीला दिसणार, माझ्या तुझ्यावर विश्वास आहे”, ” सगळ्यांना तुम्ही माहीत आहात आणि तुमचं कामसुद्धा मस्त आहे.” अभिनेत्री स्नेहल शिदमने कमेंट करीत तिचीदेखील तशीच परिस्थिती आहे, अशा आशयाची कमेंट केली आहे.
दरम्यान, अभिनेता स्वप्नील पवार ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत खलनायकाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याने सत्यजित ही भूमिका साकारली आहे.