‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत सध्या सूर्याची बहीण तेजूच्या लग्नाची घाई चाललेली पाहायला मिळत आहे. सूर्या, तुळजा, भाग्यश्री, धनश्री, राजश्री, त्यांचे वडील, सूर्याचे मित्र काजू व पुड्या तसेच सूर्याचे मामा, त्याची आत्या, असे सर्व जण तेजूच्या लग्नाची जोरदार तयारी करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, या सगळ्यात तेजूची व तिच्या कुटुंबाची फसवणूक होत आहे आणि ही फसवणूक तुळजाचे वडील डॅडी व त्यांचा मुलगा शत्रू करत आहेत. त्यांनी पंटर पिंट्या ऊर्फ समीर निकम या गुन्हेगाराला तुरुंगातून पॅरोलवर सोडवून आणले आहे. मात्र, हे सत्य सूर्याला समजणार का, असा प्रश्न समोर आलेला प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे.
पिंट्याचे सत्य सूर्यासमोर येणार?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लाखात एक आमचा दादा या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, डॅडी शत्रूच्या रूममध्ये येतात आणि त्याला म्हणतात, “तुमच्या लग्नाचा बॅण्ड वाजण्याआधीच तुमचा बॅण्ड वाजतोय बहुतेक. पिंट्याचा पॅरोल संपलाय आणि तो परत न गेल्यामुळे त्याला फरारी घोषित केलाय. ही बातमी उद्याच्या पेपरात येणार आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर शत्रू डॅडींना विचारतो, “डॅडी, आता काय करायचं?”, डॅडी म्हणतात, “होळी.” त्यानंतर शत्रू एका ठिकाणी पेपरचे गठ्ठे जाळताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतो, “तेजूच्या आणि माझ्यामध्ये जो येणार, त्याची होळी अशीच जळणार. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूर्याला पेपरचे एक पान सापडले आहे, ज्यामध्ये पिंट्याचा फोटो छापून आलेला दिसत आहे. त्याकडे सूर्या बघताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “डॅडी आणि शत्रुच्या प्लॅननंतरही सूर्यापर्यंत बातमी पोहोचणार…!!”, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तुळजाचा भाऊ शत्रूला तेजूबरोबर लग्न करायचे आहे. त्यासाठी डॅडींनी सगळी योजना आखली आहे. त्यांनी पंटर पिंट्या नावाच्या गुन्हेगाराला तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आणले आणि त्याला समीर निकम हे नाव दिले. त्यांनी त्याचे स्थळ तेजूसाठी सुचवले. सूर्या डॅडींना आदर देत असल्याने त्यांनी आणलेले स्थळ हे चांगलेच असणार, असा विश्वास त्याला आहे. तेजूबरोबर पंटर पिंट्या ऊर्फ समीर निकमचे लग्न ठरवायचे. पण, ऐन लग्नाच्या वेळी तो तिथून गायब होणार आणि त्या जागी शत्रू मोठेपणा दाखवत तेजूबरोबर लग्न करणार, अशी डॅडी व शत्रूची योजना आहे.
दरम्यान, आता प्रोमोमध्ये दाखविल्यानुसार सूर्याला जर पिंट्याचे सत्य समजले तर तो तेजूचे लग्न मोडणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.