‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायम उत्सुकता टिकवून ठेवते. आता ‘लाखात एक आमचा दादा’चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
“त्या नराधमाला तू माझ्यासमोर जिवंत आणशील”
झी मराठीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला सूर्या आणि तुळजा मंदिरात जात आहेत. तुळजा सूर्याला म्हणते, “सिद्धार्थ अशा कुठल्याच फसव्या गोष्टी करूच शकत नाही, तो येणार नाही सूर्या”; त्यानंतर सूर्या देवीपुढे हात जोडून म्हणतो, “आई भवानी, आज जर तुळाजाच्या पुढे सिद्धार्थचा खरा चेहरा आला नाही तर तुळजाच्या मनातून मी कायमचा उतरेन”, तुळजा मंदिराबाहेर जात असते तेवढ्यात एक मुलगी मंदिरात येते आणि सिद्धार्थ अशी हाक मारते. कुठे आहेत डॉक्टर सिद्धार्थ? असे म्हणते. ते ऐकताच तुळजा थांबते. तिला धक्का बसतो. “म्हणजे सूर्या खरं बोलत होता?”, असे म्हणत ती जागीच खाली बसते. सूर्या तिला सावरण्यासाठी पुढे जातो. रडत असलेल्या तुळजाला ती मुलगी सांगते, “आज आमचं लग्न आहे ना”, त्यावर तुळजा तिला सांगते, “तो येणार नाही.” तर सूर्या म्हणतो, “तुमच्यासारखंच त्यानं तुळजालादेखील फसवलं आहे.” हे ऐकताच ती मुलगी रडत असल्याचे पाहायला मिळते. सत्य समजल्यानंतर तुळजा सूर्याला म्हणते, “सूर्या तू मला वचन दे, त्या नराधमाला तू माझ्यासमोर जिवंत आणशील आणि माझ्या पायाशी टाकशील.”
हा प्रोमो शेअर करताना ‘उत्सव शक्तीचा, निर्धार तुळजाचा’, असे कॅप्शन दिले आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, तुळजाला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थबरोबर लग्न करायचे असते, म्हणून ती तिच्या मित्राच्या सूर्याच्या मदतीने तिच्या वडिलांनी ठरवलेल्या लग्नातून पळून जाते. मात्र, जेव्हा सूर्या आणि तुळजा ठरलेल्या ठिकाणी पोहचतात तेव्हा सिद्धार्थ तिथे येत नाही. अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो सापडत नाही. सूर्या आणि तुळजा जेव्हा परत येतात, तेव्हा रागावलेले डॅडी तुळजा आणि सूर्याचे लग्न लावून देतात. त्यानंतरही ते सिद्धार्थला शोधत राहतात. जेव्हा सूर्याच्या वडिलांना तात्यांना दवाखान्यात दाखल केले जाते, त्यावेळी त्याला सिद्धार्थ दिसतो. तो त्याचा पाठलाग करतो, तेव्हा तो एका मुलीबरोबर दिसतो. त्यावेळी सिद्धार्थचा खरा चेहरा तुळजासमोर आणायचा असे सूर्या ठरवतो.
हेही वाचा: Singham Again : रामायणाशी खास कनेक्शन ते खलनायकाचा जबरदस्त अंदाज! ५ मिनिटांचा ट्रेलर पाहिलात का?
आता सूर्या आणि तुळजाला सिद्धार्थ सापडणार का, ते त्याला काय शिक्षा देणार, मालिकेत पुढे काय होणार आहे; हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.