‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत सध्या अनेकविध गोष्टी घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सूर्याच्या बहिणीचे तेजूचे शत्रूबरोबर लग्न झाले आहे. शत्रूला तिच्याबरोबर लग्न करायचे होते, म्हणून डॅडींनी मोठे कारस्थान केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, लग्नानंतर शत्रू तिला त्रास देत असल्याचे मालिकेत पाहायला मिळते. याबरोबरच शत्रू व डॅडी सूर्याविरूद्ध अनेक कट कारस्थान करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच शाळेतील मुलांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. शत्रूने पोषण आहारात कोणतेतरी औषध टाकले होते. त्यासाठी सूर्याला जबाबदार ठरवले गेले. पोलिसांनी सूर्याला अटकदेखील केली होती. त्यानंतर शत्रू शाळेतील सीसीटीव्ही बंद कऱण्याचे विसरला म्हणून डॅडींनी सूर्याला जामिनावर सोडवून आणले होते. आता तुळजाला शत्रूविरूद्ध ठोस पुरावा मिळाल्याचे मालिकेत पाहायला मिळाले आहे. आता शत्रू व डॅडींचे सत्य सर्वांसमोर आणण्याचा तुळजाचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
डॅडी लगेच विजय साजरा करू नका…
लाखात एक आमचा दादा मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, डॅडींच्या घरात मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरू आहे. तुळजादेखील तिच्या माहेरी गेली आहे. ती मनातल्या मनात म्हणते, “डॅडी लगेच विजय साजरा करू नका, अजून माझा वार करायचा बाकी आहे. त्यानंतर तुळजा तेजूकडे जाते व तिला म्हणते, “आता मी तुला जे काही सांगणार आहे ते प्लीज शांतपणे ऐकून घेशील. शाळेत जी विषबाधा झाली होती, त्यासाठी पोलिसांनी सूर्याला पकडलं होतं, पण ती विषबाधा शत्रूने केली होती. हा पेन ड्राइव्ह, यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे.” त्यांचे हे बोलणे शत्रू ऐकत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर जिथे कार्यक्रम सुरू आहे तिथे तुळजा जाते व सर्व महिलांना नमस्कार करत म्हणते, “आज आपण इथे या सुंदर सणानिमित्त जमलेले आहोत आणि या निमित्ताने मला तुम्हाला खास गोष्ट दाखवायची आहे. एक खास व्हिडीओ आणि काही फोटो.” तिच्या या बोलण्यावर डॅडी, शत्रू व सूर्या ती काय सांगणार याकडे लक्ष देऊन पाहत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना, “तुळजा डॅडी आणि शत्रूचा खरा चेहरा सर्वांना दाखवण्यात यशस्वी ठरणार का?”, अशी कॅप्शन दिली आहे.
डॅडी सूर्यासमोर व इतरांसमोर चांगले वागण्याचे नाटक करतात, मात्र प्रत्यक्षात ते त्याचा त्यांच्या कामासाठी वापर करून घेतात. डॅडींचे हे खरे रूप तुळजाला माहीत आहे. तिने अनेकदा सूर्याला डॅडींच्या कारस्थानांविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सूर्याने तिला कायम डॅडींविरुद्ध काहीही बोलण्यास मनाई केली आहे.
आता शत्रूला तुळजाच्या प्लॅनबद्दल समजले आहे का, तेजू शत्रूचे सत्य समोर आणण्यास तुळजाला मदत करणार का, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.