‘लाखात एक आमचा दादा’ मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात घर करताना दिसत आहे. सूर्या आणि तुळजा यांची जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. आता ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मालिकेमध्ये नवीन वळण येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
सूर्या आणि तुळजा अडकणार लग्नबंधनात!
‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, तुळजा आणि सूर्या यांनी गळ्यात हार घातले असून, ते जोडीने सूर्याच्या घरात प्रवेश करतात. ते एकमेकांकडे बघताना, त्यांनी एकत्र घालवलेले चांगले क्षण त्यांना आठवल्याचे पाहायला मिळते. तितक्यात सूर्याच्या चार बहिणी त्यांचे स्वागत करतात आणि तुळजाला माप ओलाडूंन घरात येण्यास सांगतात. तुळजा याला होकार देताना दिसत आहे. यावेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “स्वप्नातील तुलना सत्यात येणार, सूर्यादादाची लव्ह स्टोरी पूर्ण होणार” असे म्हटले आहे. त्याबरोबरच लवकरच सूर्याची स्वप्नपूर्ती होणार, असे लिहिले आहे.
आता हा प्रोमो समोर आल्यानंतर, मालिकेत कोणते नवे वळण येणार?सूर्याची लव्ह स्टोरी कशी पू्र्ण होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सध्या मालिकेत तुळजाच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले असून, तिला हे लग्न करायचे नाही. तिचे तिच्या कॉलेजमधील एका मुलावर प्रेम आहे आणि तिला त्याच्याबरोबर लग्न करायचे आहे. मात्र, डॅडींच्या भीतीने तिने त्यांनी ठरवलेल्या लग्नाला होकार दिला. मात्र, सूर्याच्या मदतीने हे लग्न मोडण्याचादेखील ती प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सूर्याचे तुळजावर प्रेम आहे आणि तो सतत तिला मदत करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. तुळजाला दुसरा मुलगा आवडत असल्याचे माहिती झाल्यावर तो प्रचंड दु:खी झाला होता. मात्र, त्यानंतरदेखील तुळजाला मदत करण्यासाठी तो कायम पुढे असल्याचे पाहायला मिळते.
हेही वाचा: VIDEO: राम मंदिरापाठोपाठ हाजी अलीच्या दर्ग्यालाही अक्षय कुमारची १.२१ कोटींची देणगी
आता या नवीन प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे सूर्या आणि तुळजाचे लग्न कोणत्या परिस्थितीत होते, मालिका कोणते नवे वळण घेणार आहे?हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत सूर्याच्या भूमिकेत नितीश चव्हाण आणि तुळजाच्या भूमिकेत दिशा परदेशी यांनी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याबरोबरच सूर्या आणि त्याच्या बहिणींचे नातेदेखील प्रेक्षकांना भुरळ घालत असल्याचे दिसत आहे.