‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशी यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. नितीशने या मालिकेत सूर्या ही भूमिका साकारली आहे; तर दिशाने या मालिकेत तुळजा ही भूमिका साकारली आहे. तुळजा नेहमीच सूर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहताना दिसते. त्याच्या प्रत्येक संकटात त्याला साथ देते. सूर्याचेदेखील तुळजावर प्रचंड प्रेम असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये सूर्या तुळजावर हात उचलणार असल्याचे पाहायला मिळत आहे. नेमके असे काय घडणार, ज्यामुळे सूर्या तुळजावर हात उचलणार, हे जाणून घेऊ.
“दीडदमडीचा नोकर तू…”
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, डॅडींच्या घरात एक पार्टी आहे. त्यामध्ये सूर्या लोकांना सरबत देत आहे. त्यामधील एक व्यक्ती सरबत प्यायल्यानंतर नापसंती दर्शवीत ते सरबत चांगले नसल्याचे सांगते. दुसरी एक व्यक्ती सूर्याला म्हणते, “दीडदमडीचा नोकर तू तुझी लायकी काय आहे, आमच्यासमोर उभे राहायची?” पुढे पाहायला मिळते की, छत्री सूर्याच्या ब्लेझरवर चहा ओततो. त्यानंतर तो म्हणतो की, मी तुमच्यासाठी ब्लेझर आणतो. तो ब्लेझर घालून पार्टीत येतो. छत्री दारू असलेला ज्युस सूर्याला पिण्यासाठी देतो. सूर्याकडे पाहत शत्रूचा मित्र त्याला म्हणतो की, दाजींनी घातलेला ब्लेझर तू आपल्या सेंड ऑफ पार्टीला घातला होतास ना? आज कपडे, उद्या सातबारा नावावर… त्या मुलाचे हे बोलणे ऐकताच सूर्याचा संताप अनावर होतो. तो त्या मुलाला मारतो आणि म्हणतो की, भिकारी वाटलो का मी तुला? त्याचे हे रूप बघून, तुळजा त्याला अडवण्यासाठी जाते. तर संतापाच्या भरात तो तिच्यावर हात उचलतो. तो तिला म्हणतो की, तुला हेच पाहिजे होतं ना?
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सूर्या तुळजाच्या घरातून निघून जात आहे. तर तुळजा रडत आहे. या प्रोमोला झालेला अपमान सहन न होऊन, भावनेच्या भरात सूर्या तुळजावर हात उचलणार…, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्या व तुळजामध्ये दुरावा आणण्याचे कारस्थान हे शत्रू व डॅडींचे आहे. सूर्याला घरी राहण्यासाठी मदत करण्याचे नाटक करीत त्याला घरजावई झाल्याची जाणीव करून देणे, त्याचा सतत विविध पद्धतींनी अपमान करणे, या गोष्टी शत्रूने केल्या. गावकरी व इतरांकडून झालेल्या अपमानामुळे सूर्या दुखावला गेल्याचे पाहायला मिळाले. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.