‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada)मालिकेतील सूर्या, त्याच्या चार बहिणी, तुळजा, डॅडी, त्यांच्या दोन पत्नी, शत्रू, काजू पुड्या, तात्या, छत्री अशी सगळीच पात्रे लोकप्रिय आहेत. डॅडींना त्यांच्या गावात मान आहे. गावातील लोक त्यांच्याकडे न्यायनिवाडा करण्यासाठी येतात. त्यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी त्यांच्याकडे येतात. डॅडी सर्वांसमोर उदार मनाचे, न्यायप्रिय असल्याचे नाटक करतात. मात्र, ते सर्वांची फसवणूक करीत असल्याचे पाहायला मिळते. सूर्या त्यांना आदर देतो. त्यांच्या शब्दापुढे जात नाही. डॅडी म्हणेल ती पूर्व दिशा, अशा विचाराने तो चालतो. मात्र, समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये सूर्याने संपूर्ण गावासमोर शत्रूला त्याच्या चुकीसाठी कडक शब्दांत सुनावले असल्याचे पाहायला मिळत आहे. आता डॅडींनी झालेल्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्धार केल्याचे पाहायला मिळत आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, महाशिवरात्रीनिमित्त सर्व जण मंदिरात गेले आहेत. डॅडी व सूर्याचे कुटुंबदेखील तिथे उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. यावेळी शत्रू तेजूवर हात उचलतो. ते पाहून सूर्याचा संताप अनावर होतो. तो शत्रूला मारतो. सूर्याचा राग पाहून त्याला थांबविण्यासाठी डॅडी त्याला म्हणतात, “परत ते असं करणार नाहीत. त्यांना माफ करा.” डॅडी असे म्हणून सूर्यासमोर हात जोडतात. सूर्या म्हणतो, “बाईवर हात उचलणारा पुरुष हा खरं तर पुरुष म्हणून घ्यायच्याच लायकीचा नसतो. बाईचं बाईपण जपतो तो खरा पुरुष असतो आणि असा पुरुष होणं जोपर्यंत तुला जमणार नाही, तोपर्यंत माझी बहीण तुझ्या सावलीलासुद्धा उभी राहणार नाही.” सूर्याच्या या बोलण्यावर शत्रू म्हणतो, “ए बायको आहे ती माझी.” त्यावर सूर्या चिडून म्हणतो, “माझी ती बहीण आहे. इथून पुढे तिच्या आजूबाजूलासुद्धा उभं राहायचं नाही”, अशा शब्दांत शत्रूला सुनावत तो तेजूला घरी घेऊन जातो. त्यानंतर डॅडी म्हणतात, “आज गावापुढं मान झुकवलीस तू माझी. नाही तुझ्यावर लवकरच ही वेळ आणली, तर नावाचा जालिंदर निंबाळकर नाही.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सूर्याच्या सडेतोड वागण्याचा डॅडी घेणार बदला…!’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शत्रू लग्न झाल्यापासून तेजूला त्रास देत होता. मात्र, सूर्याला काळजी वाटू नये, त्याला वाईट वाटू नये म्हणून तेजूने सूर्याला याबद्दल काहीही सांगितले नव्हते. आता मात्र शत्रूचा खरा चेहरा सूर्यासमोर आला आहे. सूर्या त्याच्या बहिणींची खूप काळजी घेतो, त्यांना जपतो, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो आणि त्यामुळे शत्रूने तेजूवर हात उचलल्यानंतर त्याचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. आता डॅडी बदला घेण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.