‘लाखात एक आमचा दादा'( Lakhat Ek Aamcha Dada )मधील बहिणीची व कुटुंबाची काळजी घेणारा सूर्यादादा प्रेक्षकांचा विशेष लाडका आहे. कमी शिक्षण घेतलेला सूर्या त्याच्या कुटुंबासाठी अहोरात्र मेहनत, काळजी करताना दिसतो. सूर्यादादाची त्याच्या बहिणींवर विशेष माया आहे. वडिलांचीदेखील तो तितक्याच प्रेमाने काळजी घेतो. तुळजाला समजून घेतो. डॅडींना देव मानतो आणि त्यांच्या शब्दाखातर काहीही करायला तयार होतो. सूर्याची आई लहानपणीच मुलांना सोडून गेली, तेव्हापासून गावातील काही लोक त्यांना टोमणे मारतात. सूर्याच्या मनातही आईविषयी राग आहे. मात्र, ती तुरुंगात असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. डॅडी व तिच्यामध्ये संवाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मोठा ट्विस्ट
लाखात एक आमचा दादा या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गावातील काही लोक डॅडींच्या घरासमोर आले आहेत. डॅडी ज्या खुर्चीवर बसून गावातील लोकांना सल्ले देतात, मदत करतात, न्यायनिवाडा करतात, त्या खुर्चीवर शत्रू बसला आहे. एक महिला शत्रूला म्हणते, मला हा न्याय मान्य नाही. डॅडी असते ना, तर असा न्याय कधीच केला नसता. गावातील इतर लोक सूर्याला म्हणतात की, तूच काय तो न्याय कर. त्यानंतर सूर्या घरातून डॅडींचा एक फोटो घेऊन बाहेर येतो. तो फोटो डॅडींच्या खुर्चीवर ठेवत म्हणतो की, डॅडी माझं सर्वस्व आहेत. ते असताना मी त्यांची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे या खुर्चीवर डॅडी बसतील आणि त्यांच्या साक्षीने मी न्याय करेन.
दुसरीकडे डॅडी तुरुंगात गेले आहेत. ते एका महिलेशी बोलताना दिसत आहेत. ते, “सूर्याच्या मातोश्री, लिंगोबाचा पत्ता सांग आणि इथून सूटका करून घे”, असे म्हणत तिच्या हातात काही कागदपत्रे देतात. सूर्याची आई ते कागद फाडून टाकते आणि डॅडींची कॉलर पकडत म्हणते, देव नाही; राक्षस आहेस. लवकरच माझा सूर्या तुझा नाश करील. हे ऐकल्यानंतर डॅडींच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव पाहायला मिळत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना, ‘सूर्यादादा करणार का योग्य न्याय?’, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, लाखात एक आमचा दादा या मालिकेत सध्या सूर्या व त्याचे कुटुंब डॅडींच्या घरी राहायला गेले आहे. डॅडींना सूर्याच्या घरातील लिंगोबा पाहिजे असल्याने तो मिळविण्यासाठी ते वेगवेगळ्या योजना करताना दिसत आहेत. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.