‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) मालिकेत नुकतीच एक नवीन एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री पुष्पा चौधरी या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकेत त्यांनी पुष्पा काकी ही भूमिका साकारली आहे. सूर्याची पुष्पा काकी खूप वर्षांनंतर घरी परतली आहे. पुष्पा काकीला अचानक घरी पाहिल्यानंतर सूर्याचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले होते, तर भाग्यश्रीला ही तिची आई आहे का, असा प्रश्न पडला होता. मात्र, त्यानंतर ती त्यांची काकी असल्याचे समोर आले. जेव्हा गरज होती, त्यावेळी काकी परत आली नाही, म्हणून सूर्याची तिच्यावर नाराजी होती. मात्र, पुष्पा काकीने त्याची माफी मागितल्याचे मालिकेत पाहायला मिळाले. आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून पुष्पा काकीच्या परत येण्याचा उद्देश तुळाजाला माहीत होणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

तुळजासमोर पुष्पा काकीचे सत्य येणार का?

प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, तुळजा व पुष्पा काकी एका खोलीत झोपल्या आहेत. रात्री अचानक पुष्पा काकी झोपेतून उठते व स्वत:शीच म्हणते, “कुठल्याही परिस्थितीत तो लिंगोबा सापडायला पाहिजे”, असे म्हणून काकी खोलीतून बाहेर पडते. त्यानंतर पुष्पा काकी संपूर्ण घरात शोधाशोध करत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे तुळजालासुद्धा जाग येते. पुष्पा काकी तिच्या जागेवर नसल्याचे ती पाहते. ती स्वत:शी म्हणते, एवढ्या रात्री काकी कुठे गेल्या असतील? तीसुद्धा काकीला शोधते, तर तिला पुष्पा काकी काहीतर शोधत असल्याचे दिसते. किचन कट्ट्यावर चढून कपाटात शोध घेणाऱ्या काकीला पाहिल्यानंतर तुळजा आश्चर्याने काकी असे म्हणते.

हा प्रोमो शेअर करताना, “पुष्पा काकी परत येण्यामागचं कारण तुळजाला समजेल का…?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, डॅडी व पुष्पा काकी यांनी एकत्र येत सूर्याविरूद्ध कट रचला आहे. डॅडींनी पुष्पा काकीला जगतापांच्या नावावर लिहून दिलेलं बारा वतनांचं पत्र, दस्तऐवज आणि बारा वतनांचा लिंगोबा एका आठवड्याच्या आत आणून द्यायला सांगितले आहेत. हे जर काकीने केलं नाही तर तिच्या नवऱ्याच्या खऱ्याखुऱ्या अस्थींचं विसर्जन कृष्णेत करावं लागेल, अशी धमकीही दिली आहे. आता पुष्पा काकी व डॅडींचा प्लॅन यशस्वी होणार की याबद्दल तुळजाला कळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader