‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सूर्या आणि तुळजा ही पात्रे घराघरांत पोहोचली आहेत. मालिकेत येणाऱ्या ट्विस्टमुळे आता पुढच्या भागात काय पाहायला मिळणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. आता झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये गुरुजी सत्यजितला म्हणजेच तुळजाच्या होणाऱ्या नवऱ्याला गाढवाशी लग्न करायला सांगतात, हे पाहायला मिळत आहे.
सत्यजितचा डाव त्याच्यावरच उलटणार…
प्रोमोच्या सुरुवातीला तुळजाचे रेड्याबरोबर लग्न लावून दिले जात आहे. तेवढ्यात एका गुरुजींची एन्ट्री होते आणि ते लग्न थांबवतात. हे काय सुरू आहे? असे विचारतात. तिथे आधीपासून उपस्थित असलेली व्यक्ती म्हणते, “आमचे गुरुजी खूप ज्ञानी आहेत. त्यांच्या अभ्यासापुढे आमचा सगळ्यांचा अभ्यास फिका आहे.” ते गुरुजी म्हणतात, “आज त्यांचा वाढदिवस आहे ना? मी अभ्यास केलेल्या गणिताशास्त्रानुसार त्यांचे लग्न तुळजाशी नाही, तर गाढवाशी झालं पाहिजे. तरच तुळजाच्या पत्रिकेतील विधवा होण्याचा योग निघून जाईल.” हे ऐकताच सत्यजितच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहायला मिळत आहे; तर तुळजाच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत आहे.
सत्यजितचा भाऊ त्याला म्हणतो, “तुझ्या जीवाला धोका आहे. तुला लग्न करावे लागेल.” सत्यजितची आजी म्हणते, “आणा गाढव.” तितक्यात सूर्याचे मित्र, “त्याची काही गरज नाही”, असे म्हणत, गाढव घेऊन येताना दिसतात. प्रोमोच्या शेवटी सत्यजित अंतरपाटाच्या एका बाजूला, तर गाढव दुसऱ्या बाजूला आणि सगळे त्यांच्यावर अक्षता टाकत असल्याचे पाहायला मिळते. प्रोमोत दाखविल्याप्रमाणे ही योजना सूर्याची असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा: Video: जान्हवी किल्लेकरला तिच्या मित्रांनीच पाडले तोंडघशी; म्हणाली, “आता मी तिला…”
दरम्यान, याआधी मालिकेत दाखविल्याप्रमाणे सत्यजितच्या वाढदिवसाला तुळजा त्याला शुभेच्छा देत नाही. नंतर फोनवर बोलताना मी तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा एखाद्या प्राण्याबरोबर राहीन, असे म्हणते. त्याचाच राग मनात ठेवून तो तुळजाचे लग्न रेड्याबरोबर लावण्याचा कट रचतो. तुळजाच्या पत्रिकेत विधवा होण्याचा योग असून, तिला रेड्याबरोबर लग्न करावे लागेल तेव्हाच हा धोका टळेल, असे तो सगळ्यांना सांगतो. मात्र, आता नवीन आलेल्या प्रोमोमध्ये त्याचाच डाव त्याच्यावर उलटल्याचे पाहायला मिळत आहे.
आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.