बहीण-भावाचे नाते जगातील सर्वांत सुंदर नाते मानले जाते. बहीण-भावातील प्रेम, काळजी, एकमेकांबद्दलची चिंता यामुळे हे नाते इतर नात्यांहून वेगळे ठरते. संकटाच्या वेळी बहीण-भाऊ एकमेकांचे संरक्षण करतात. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेतसुद्धा बहीण-भावातील प्रेम पाहायला मिळते.
सूर्या दादा त्याच्या बहिणींच्या इच्छेसाठी, प्रेमासाठी अनेक गोष्टी करताना दिसतो. त्यांना आई-वडिलांची माया देतो. त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्याच्या बहिणीसुद्धा सूर्यावर प्रेम करतात. त्याला वाईट वाटू नये म्हणून अनेक गोष्टी करतात. तेजू, भाग्या, धनश्री, राजश्री या त्याच्या चार बहिणी त्यांच्या सूर्यादादाला वाईट वाटू नये अशी एकही गोष्ट करत नाहीत. तेजूचे लग्न झाल्यापासून शत्रू तिला त्रास देत आहे. मात्र, सूर्याला वाईट वाटू नये म्हणून तिने त्याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूर्यासमोर शत्रूचे खरे रूप आल्याचे दिसत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सूर्या व तुळजाचे कुटुंब डॅडींच्या संपूर्ण कुटुंबासह मंदिरात आले आहे. शत्रू तेजूला एका बाजूला ओढत आणतो, तेव्हा तेजू त्याला म्हणते की मी काय मुद्दम केलं का? आता आली मला चक्कर…”, मात्र तिचे बोलणे पूर्ण होण्याअगोदरच शत्रू तिला कानाखाली मारतो. नेमके सूर्या हे पाहतो. ते तिथे पळत येतो. तो शत्रूला मारतो. सूर्याचे हे रूप पाहिल्यानंतर त्याच्यात शत्रूला भगवान शंकर दिसतात. डॅडी शत्रूच्या वतीने माफी मागत सूर्यासमोर हात जोडतात आणि म्हणतात, “परत ते असं करणार नाहीत. त्यांना माफ करा”, त्यावर सूर्या म्हणतो, “बाईवर हात उचलणारा पुरुष हा खरंतर पुरुष म्हणून घेण्याच्या लायकीचाच नसतो. बाईचं बाईपण जपतो, तो खरा पुरुष असतो”, हे म्हणताना सूर्याचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तेजूवर हात उचलणाऱ्या शत्रूला सूर्याकडून मिळणार मार”, अशी कॅप्शन दिली आहे.
नेटकरी काय म्हणाले?
हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी भाऊ असाच हवा असे म्हटले आहे, तर काहींनी महिलांचा आदर केला पाहिजे असे म्हटले आहे. अनेक प्रेक्षकांनी सूर्याचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “भाऊ प्रत्येक परिस्थितीत बहिणीबरोबर असाच पाहिजे. आता सूर्याच्या हातून प्रसाद खायचा त्या डॅडींचासुद्धा लवकर योग येऊ दे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “सूर्या त्याला अजून जोरात मार, आमच्यातर्फे मार”, आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “वाह! याची आतुरतेने वाट बघत होतो”, “असा भाऊ प्रत्येक बहिणीला असावा”, असे म्हणत सूर्याचे कौतुक केले आहे.



दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.