‘पारू'(Paaru) व ‘लक्ष्मी निवास'(Lakshmi Niwas) या मालिका एकत्र पाहायला मिळणार आहेत. पारू या मालिकेत आदित्य व अनुष्काचा साखरपुडा ठरला आहे. तर लक्ष्मी निवास या मालिकेत जयंत व जान्हवी यांचे लग्न ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे अहिल्यादेवी व जयंत यांनी कार्यक्रमासाठी एकाच पॅलेसची निवड केली आहे. आता या कारणावरून अहिल्यादेवी किर्लोस्कर व जयंत समोरासमोर येणार असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी या वाहिनीने सोशल मीडियावर पारू व लक्ष्मी निवास या मालिकांच्या महासंगमाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये अहिल्यादेवी व जयंत यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
माझ्या आईचा शब्द…
प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, अहिल्यादेवी एका महालासमोर उभी आहे. ती श्रीकांतबरोबर फोनवर बोलत असते. ती श्रीकांतला म्हणते, “आपल्या आदित्यचा साखरपुडा याच पॅलेसमध्ये होणार. तितक्यात तिला एक हेलिकॉप्टर येताना दिसते. त्या हेलिकॉप्टरमधून जयंत उतरतो. तो तिला म्हणतो, “अहिल्या किर्लोस्कर हा पॅलेस मी माझ्या लग्नासाठी पुढच्या १० दिवसांसाठी बुक केला आहे.” त्यावर अहिल्या त्याला म्हणते, “तुम्ही डेस्टिनेशन वेडिंग का करीत नाही? सगळा खर्च किर्लोस्कर करतील.” त्यावर जयंत म्हणतो, “त्यापेक्षा ग्रॅण्ड व्हेन्यू जर तुम्हाला मिळाला तर? त्याचं बुकिंग स्वत: तुमच्यासाठी करून देतो. जो मार्ग काढायचा, तो आपल्यालाच काढायचा आहे. आभाळातून देव येणार नाही.” तितक्यात दुसरे हेलिकॉप्टर येताना दिसते. अहिल्या त्याला म्हणते; पण, माणूस येऊ शकतो ना? तो माणूस तुमच्या सगळ्या समस्यांची उत्तरे देईल. त्या हेलिकॉप्टरमधून आदित्य येतो. तो जयंतला म्हणतो, “माझ्या आईचा शब्द माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. तिनं ठरवलंय, हा साखरपुडा इथेच होणार. तर इथेच होणार आणि त्याच तारखेला होणार.” जयंत त्याला म्हणतो, “माझं आणि जान्हवीचं लग्न इथेच होणार. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी.”
प्रोमो शेअर करताना, ‘अहिल्या की जयंत, लग्न आणि साखरपुड्याच्या सोहळ्याच्या स्थळासाठीची रस्सीखेच कोण जिंकणार?’, अशी कॅप्शन दिली आहे.
‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत काही दिवसांपूर्वीच जान्हवी व जयंतचे लग्न ठरले आहे. त्यांच्या लग्नामुळे जान्हवीच्या घरातील सर्व जण आनंदात असल्याचे दिसत आहे. श्रीकांत व लक्ष्मी यांना जयंत हा जान्हवीसाठी योग्य वाटत असल्यामुळे तेदेखील आनंदात आहेत. दुसरीकडे पारू या मालिकेत अहिल्यादेवीने अनुष्का व आदित्यचे लग्न ठरवले आहे. अहिल्यादेवीसाठी आदित्यने अनुष्काबरोबर साखरपुडा करण्यास होकार दिला आहे.
आता या दोन्ही कार्यक्रमांसाठी एकच ठिकाण निवडले आहे. त्यामुळे अहिल्यादेवी किर्लोस्कर व जयंत यांच्यात वाद होताना दिसत आहेत. आता पुढे काय होणार, जयंत-जान्हवीचे लग्न होणार की आदित्य-अनुष्काचा साखरपुडा हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd