Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या श्रीनिवासवर रुग्णालयात उपचार चालू असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. घरचं टेन्शन, लेकीच्या लग्नाची काळजी, पैशांची जुळवाजुळव या सगळ्या विचारात रस्त्यावरून चालत असताना अचानक श्रीनिवासचा अपघात होतो. श्रीनिवास कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नाहीयेत असं लक्ष्मीला डॉक्टर सांगतात. यानंतर ती रुग्णालयातच ओक्साबोक्शी रडू लागते.
बायकोचं प्रेम अखेरिस जिंकतं आणि श्रीनिवासला शुद्ध येते असं मालिकेत पाहायला मिळालं आहे. यादरम्यान रुग्णालयात सिद्धू, जयंत, जान्हवी, भावना, हरिश असे सगळेजण उपस्थित असतात. बाबांना शुद्ध आल्याचं समजताच सर्वांना आनंद होतो. पण, आता लक्ष्मी आणि सिद्धू हे दोघं मिळून श्रीनिवासच्या कंपनीत पैशांची अफरातफर कशी झाली याचा शोध घेणार आहे. यावेळी या दोघांना जानेवारी महिन्यातील आर्थिक हिशोबांची फाइल सापडते.
आपल्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी भावना सुद्धा सिद्धू आणि लक्ष्मी यांच्याबरोबर ऑफिसमध्ये गेलेली असते. मात्र, आता या सगळ्या घडामोडींनंतर भावनावर मोठं संकट येणार आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार झाली असून पोलीस या दोघांनाही घेऊन जातात.
आपल्या आई-बाबांना पोलीस घेऊन गेल्याचं पाहून भावना प्रचंड अस्वस्थ होते. तिला मालिकेची खलनायिका सुपर्णा भेटण्यासाठी बोलावते. यावेळी ती चिडून सुपर्णाला विचारते, “बोला तुम्हाला काय बोलायचंय?” यावर सुपर्णा म्हणते, “माझ्याकडे एक फाइल आहे, जी तुम्ही ऑफिसमधून चोरून आणली होती.” हे ऐकताच भावनाला धक्का बसतो. भावना म्हणते, “ती फाईल तुमच्याकडे कशी आली? प्लीज तुम्ही ती फाईल मला परत द्या.”
यावर सुपर्णा म्हणते, “मी तुला फाईल देईन पण, तू मला काहीतरी दिलंस तरच, मी ही फाईल तुला परत देईन.” यादरम्यान, सुपर्णा भावनाला तिचे पाय धरायला लावते. लक्ष्मी निवासला पुन्हा घरी आणण्यासाठी भावना सुपर्णाकडे विनवण्या करत असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग २१ आणि २२ मार्चला रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे. दरम्यान, या मालिकेला पहिल्या दिवसांपासून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, टीआरपी सुद्धा चांगला आहे.