Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या गाडेपाटलांच्या घरात सिद्धूची लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गाडेपाटलांना काहीही करून लवकरात लवकर सिद्धूचं लग्न लावायचं असतं. पण, दुसरीकडे सिद्धू भावनाच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो.
एकीकडे सिद्धू भावनाच्या प्रेमात असतो, तर दुसरीकडे भावना लग्नापासून दूर राहण्याचा निर्णय घेते. पहिलं लग्न मोडल्यावर भावना आनंदीचा मुलीसारखा सांभाळ करत असते. “आनंदीच माझं संपूर्ण जग आहे त्यामुळे आता लग्न करणार नाही” असा निर्णय भावना लक्ष्मीला म्हणजेच तिच्या आईला सांगते.
आनंदीची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारून आता भावनाने तिला शाळेत देखील घातलेलं असतं. मात्र, आनंदीची आत्या सुपर्णा तिला आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी नेहमी काही ना काही कारस्थान रचत असते. त्यामुळे भावनाने आनंदीला शाळेतून इतर कोणाबरोबरही घरी जायचं नाही असं बजावलेलं असतं.
आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, आनंदीला परस्पर सिद्धू शाळेतून घरी घेऊन जातो असं पाहायला मिळतंय. यानंतर भावना आनंदीला घेण्यासाठी शाळेत जाते पण, घडतं काहीतरी उलटंच…शाळेतील आनंदीच्या बाई ती केव्हाच गेली असं सांगतात. यामुळे भावना प्रचंड अस्वस्थ होते. आनंदीचा शोध घेऊ लागते. शेवटी हतबल होऊन भावना घरी जाते आणि घडलेला प्रकार तिच्या मोठ्या वहिनीला सांगते. यानंतर दोघीही पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवतात.
भावना आणि वीणा पोलीस स्टेशनला निघणार इतक्यात हातात फुगे आणि खाऊ घेऊन आनंदी सिद्धूबरोबर घरी येते. यानंतर भावना वीणा आणि आनंदी यांना आत पाठवते. पुढे, राग अनावर होऊन भावना सिद्धूला सणसणीत कानाखाली वाजवणार असल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
भावना सिद्धूला कानाखाली वाजवतेय हे पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जयंत आणि भावनाचं लग्न व्हायला पाहिजे होतं”, “भावना हा राग सुपर्णासमोर कुठे जातो? तिचे पाय धरतेस आणि सिद्धूला मारायचं…सुपर्णासमोर तुझी डाळ शिजत नाही”, “भावना खूप ओव्हर रुड वागलीये आणि आमच्या डोक्यात जातेय”, “अति झालं भावनाचं आता”, “भावना आता हे अति होतंय”, “ए बाई कशाला मारलं त्याला”, “हा अतिरेक झाला” अशाप्रकारच्या कमेंट्स या प्रोमोवर करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग २८ मार्चला रात्री आठ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.