Lakshmi Niwas Fame Divya Pugaonkar : ‘लक्ष्मी निवास’ ही ‘झी मराठी’वरील मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत जान्हवीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच मालिकेत जान्हवी आणि जयंत यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा पाहायला मिळाला होता. मात्र, आता जान्हवीची भूमिका साकारणारी दिव्या खऱ्या आयुष्यात नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे.

दिव्या पुगावकरच्या घरी सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतेच तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडल्याची माहिती समोर येत आहे. दिव्याने साखरपुड्यात मराठमोळा लूक केल्याचं फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.

हिरव्या रंगाची सुंदर अशी साडी, हातात हिरवा चुडा, गळ्यात साडीवर शोभेल असा नेकलेस, केसात गजरा असा पारंपरिक लूक दिव्याने साखरपुड्यात केला होता. अभिनेत्रीने साखरपुड्यात आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह सुंदर असं फोटोशूट देखील केलं.

दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. यानंतर गेल्या काही वर्षात अनेकदा अभिनेत्रीकडे ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारणा केली जायची. अखेर दिव्याच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे. येत्या २ ते ३ दिवसांत दिव्या आणि अक्षय साता जन्माचे सोबती होणार आहेत. या दोघांच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील बरेच सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, दिव्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकांमधून अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. या दोन्ही मालिकांमध्ये तिच्या मुख्य भूमिका होत्या. यानंतर सध्या दिव्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत महत्त्वाच्य भूमिकेत झळकताना दिसत आहे. श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची म्हणजेच जान्हवीची व्यक्तिरेखा अभिनेत्री दिव्या पुगावकर साकारत आहे. दिव्याच्या लग्नासाठी सेटवरचे तिचे सहकलाकार देखील उत्सुक आहेत.

Story img Loader