Lakshmi Niwas Fame Actress Sangeet Ceremony : ‘मुलगी झाली हो’, ‘मन धागा धागा जोडते नवा’ आणि सध्या सुरू असलेली ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांमधून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. वैयक्तिक आयुष्यात दिव्या लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच अभिनेत्रीचा साखरपुडा पार पडला आणि आता तिच्या संगीत सोहळ्यातील Inside व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्या पुगावकरच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या जोडप्याचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ मध्ये पार पडला होता. तेव्हापासून दिव्याचे चाहते अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता तो क्षण जवळ आलेला आहे. दिव्याच्या घरी आता लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.

दिव्या आणि अक्षय यांचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात दोघांनीही मराठमोळा लूक केल्याचं पाहायला मिळालं. यानंतर शुक्रवारी रात्री ( १४ फेब्रुवारी ) दिव्याचा संगीत सोहळा संपन्न झाला. यावेळी या जोडप्याने मिळून जबरदस्त एनर्जीसह सुपरहिट बॉलीवूड गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

संजय दत्तचं “आइला रे लडकी मस्त मस्त तू…” हे गाणं सर्वत्र लोकप्रिय आहे. या गाण्याला जवळपास २९ वर्षे होऊनही याची लोकप्रियता आजही कायम आहे. संजू बाबाच्या याच सुपरहिट गाण्यावर दिव्या पुगावकर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह थिरकली आहे. दोघेही तोंडात रुमाल घेऊन चित्रपटात जशा हूकस्टेप्स आहेत, अगदी तशाचप्रकारे या व्हिडीओमध्ये नाचताना दिसत आहेत. यावरून दोघांचंही बॉण्डिंग किती सुंदर आहे हे पाहायला मिळतं.

दिव्याने संगीत सोहळ्यात भरजरी डिझायनर लेहेंगा घातला होता. तर, तिच्या होणाऱ्या नवऱ्याने काळ्या रंगाचा सूट घातल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दोघेही या व्हिडीओमध्ये तुफान एनर्जीसह डान्स करत असल्याचं दिसत आहे. दिव्या आणि अक्षय यांच्या संगीत सोहळ्याला सिद्धार्थ खिरीड, सृजन देशपांडे, स्नेहलता अशी कलाकार मंडळी देखील उपस्थित होती.

दरम्यान, दिव्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची धाकटी मुलगी जान्हवीची भूमिका साकारत आहे. मालिकेत जान्हवीचा नुकताच भव्यदिव्य लग्नसोहळा पाहायला मिळाला होता. आता मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडल्यावर दिव्या खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडणार आहे.