Marathi Actress Kelvan : ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना जयंत आणि जान्हवी यांचा भव्य लग्नसोहळा पाहायला मिळाला होता. मात्र, मालिकेतील जान्हवी केवळ ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीन सुद्धा एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. जान्हवीची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर येत्या काही दिवसात लग्नबंधनात अडकणार आहे. यानिमित्ताने मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी खास तिच्यासाठी केळवणाचं आयोजन केलं होतं.

दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे. या दोघांचा तिलक समारंभ १९ डिसेंबर २०२१ रोजी पार पडला होता. यानंतर अनेकदा अभिनेत्रीकडे ती लग्नबंधनात केव्हा अडकणार याबद्दल विचारणा केली जायची. अखेर नवीन वर्षाच्या सुरुवातीला लग्नपत्रिकेची लहानशी झलक सर्वांबरोबर शेअर करत दिव्याने ती लग्नबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं.

दिव्या पुगावकर आणि तिचा होणार नवरा अक्षय घरत यांच्यासाठी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांनी खास केळवणाचं आयोजन केलं होतं. या जोडप्यासाठी रेस्टॉरंटमध्ये सुंदर रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली होती. केळीच्या पानावर ‘दिव्या आणि अक्षयचं केळवण’ असं सुंदर अक्षरात लिहिण्यात आलं होतं. यानंतर या दोघांचं औक्षण करून मालिकेतल्या सगळ्या कलाकारांनी यांचं स्वागत केलं.

केळवणासाठी दिव्याने सुंदर अशी शिमरी साडी तर, अक्षयने लाल रंगाचा कुर्ता घातला होता. या दोघांच्या केळवणासाठी अक्षया देवधर व हार्दिक जोशी, मीनाक्षी राठोड, हर्षदा खानविलवकर, तुषार दळवी, निखिल राजेशिर्के, कुणाल शुक्ला, अनुज ठाकरे असे सगळे कलाकार उपस्थित होते.

दिव्या आणि अक्षयने एकमेकांना घास भरवला, त्यानंतर केक कापून केळवण साजरं केल्याचं पाहायला मिळालं. दिव्याच्या सहकलाकारांनी यावेळी धमाल केल्याचं तसेच या सगळ्या कलाकारांनी नवीन जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्याचं देखील व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आता दिव्या पुगावकर कधी लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सांगायचं झालं, तर अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असं नमूद केलेलं आहे.

Story img Loader