Zee Marathi Lakshmi Niwas Fame Harshada Khanvilkar : ‘झी मराठी’वर नुकतीच ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन कौटुंबिक मालिका सुरू झालेली आहे. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी या मालिकेत ‘लक्ष्मी’ हे मध्यवर्ती पात्र साकारलं आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
एकत्र कुटुंब जपणारी, आपल्या मुलांच्या भल्याचा विचार करणारी, नवऱ्याच्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे साथ देणारी अशी या लक्ष्मीची भूमिका आहे. तर, श्रीनिवास यांच्या भूमिकेत अभिनेते तुषार दळवी झळकत आहेत. लक्ष्मीसारखी भूमिका मिळावी यासाठी मी आतुरतेने वाट पाहत होते असं मत नुकतंच हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केलं आहे.
‘लक्ष्मी’ साकारत असलेल्या हर्षदा खानविलकर म्हणतात, “२०२४ मध्ये मी मॅनिफेस्ट केलं होतं की, मला वेगळ्या प्रकारची भूमिका करायची आहे. मी माझ्या मित्र परिवारासमोर बोलायचे मला सोशीत आणि सोज्वळ भूमिका करायची आहे. त्यांच्यासाठी ती मस्करी होती कारण मी नेहमीच सशक्त महिलेच्या भूमिका केल्या आहेत. मी स्वतःही पूर्ण वर्षभर विचार करत होते की, मी सोज्वळ भूमिका करू शकेन का. याआधी मी जे कामं केले आहे ते छान होतं पण, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. मी युनिव्हर्समध्ये ही गोष्ट बोलत राहिले की, मला अशी एक भूमिका करायची आहे आणि युनिव्हर्सनी मला ‘लक्ष्मी निवास’ मालिकेद्वारे ती भूमिका दिली.”
“लक्ष्मी हा माझा ड्रीम रोल आहे. २०२४ मध्ये मला फिरायला जायचं होतं पण, बॅक टू बॅक काम करत असल्यामुळे ते शक्य नाही झालं. हरकत नाहीच कारण, मी काम करत होते ही चांगली गोष्ट आहे.” असं हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं.
याशिवाय ‘लक्ष्मी निवास’मध्ये जान्हवीची भूमिका साकारत असलेली दिव्या पुगावकर तिच्या भूमिकेविषयी म्हणाली, “२०२४ ची बेस्ट आठवण, जेव्हा मला कळलं की, मी ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका करत आहे. माझी नेहमी मनापासून इच्छा असते, माझं एक कामं झालं की, माझ्या हातात दुसरं कामं असावं आणि माझ्यासाठी ती अचिव्हमेंट आहे. मी या क्षेत्रात ७-८ वर्ष कामं करत आहे पण, नेहमी माझ्या हातात कामं राहिलंय. पुढेही असंच राहूदे फक्त माझ्यासाठी नाही तर इतर कलाकारानंसाठीही…सर्वांना मनासारख्या संधी मिळोत.”