‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मोठी स्टारकास्ट असणारी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. लक्ष्मी, श्रीनिवास, भावना, जान्हवी, मंगला, संतोष, वीणा, हरीश, सिंचना, जयंत अशा मालिकेतील सगळ्या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. आज ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील वीणा म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोडचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.

काही दिवसांपूर्वी मीनाक्षी राठोडने नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. मुंबईत हक्काचं घर घेण्याचं स्वप्न तिचं पूर्ण झालं आहे. तिने पती, कैलास वाघमारेच्या साथीने गोरेगावात नवीन घर घेतलं आहे. आज मीनाक्षीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने कैलास वाघमारेने मीनाक्षीबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कैलासने मीनाक्षीबरोबर फोटो शेअर करत लिहिलं आहे, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मेरे बरक का ताबीज.” कैलासने शेअर केलेल्या या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टवर चाहत्यांनी मीनाक्षीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, मीनाक्षी राठोडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘लक्ष्मी निवास’ आधी ‘अबोली’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मलिकांमध्ये काम केलं होतं. ‘अबोली’ मालिकेतील निता सुर्वे आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील देवकी या भूमिका मीनाक्षीने उत्कृष्टरित्या साकारल्या होत्या. तिने या भूमिका आपल्या दमदार अभिनयाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्या होत्या. आतादेखील ‘लक्ष्मी निवास’मधील वीणाच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे. मीनाक्षीचा पती कैलास हा देखील उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. मीनाक्षी व कैलासला अडीच वर्षांची मुलगी आहे, जिचं नाव यारा आहे. याराचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात.