Zee Marathi Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत नुकताच सिद्धूचा मनाविरुद्ध साखरपुडा पार पडल्याचं पाहायला मिळालं. सिद्धूचं खरं प्रेम भावनावर असतं पण, प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात काहीतरी भलतंच घडतं. त्याचा साखरपुडा पूर्वीशी होतो. यामुळे सिद्धू प्रचंड नाराज होतो. मात्र, आता मालिकेत एक नवीन फिल्मी ट्विस्ट येणार आहे.

सिद्धू पहिल्या नजरेतच भावनाच्या प्रेमात पडलेला असतो. पण, भावना काही केल्या त्याला दाद देत नसते. आपलं सगळं आयुष्य आता आनंदीला सांभाळण्यात घालवायचं असं भावनाने ठरवलेलं असतं. पण, काही केल्या भावनाशी लग्न करायचं यावर सिद्धू ठाम असतो. कालांतराने, अशा काही घडामोडी घडतात की, वडिलांची राजकीय मैत्री निभावण्यासाठी सिद्धू आणि पूर्वीचं लग्न ठरवलं जातं आणि सिद्धूच्याही नकळत त्याचा साखरपुडा करण्यात येतो.

सिद्धूसाठी सगळेच आनंदी असतात. अगदी भावना सुद्धा खूश असते पण, सिद्धूचा मात्र प्रेमभंग होतो. अशातच आता लग्नाचे पुढील विधी सुरू होत असताना मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. यावेळी भावना पूर्वीला हळदी-कुंकू लावण्यासाठी पुढे जाते.

भावना हळदी-कुंकू लावण्यासाठी जातेय हे पाहताच सिद्धूची आजी प्रचंड भडकते आणि भावनाला रागात म्हणते, “अगं ए…बाजूला हो… लग्नाच्या दिवशीच स्वत:च्या नवऱ्याला गिळून बसलीस. आता आमच्या घरात येऊन कुंकवाला हात लावतेस. अगं सौभाग्याचं लेणं आहे ते…तुझ्यासाठी नाहीये.”

भावनाचा अपमान सिद्धूला सहन होत नाही, तो लगेच उठून आजीला प्रत्युत्तर देत म्हणतो, “बास झालं… तुझ्या या जुन्या कल्पना तुझ्यापाशीच ठेव. आमच्यावर लादू नकोस. इथे जमलेल्या सगळ्या बायकांपेक्षा भावना मॅडम ग्रेट आहेत.”

भांडण शांत झाल्यावर सिद्धूची आई त्याला “हे कुंकू देवीसमोर ठेव आणि पूर्वीच्या कपाळाला लाव” असं सांगते. पण, इतक्यात त्याचा तोल जातो आणि ताट हातातून निसटून सगळं कुंकू भावनाच्या कपाळावर पडतं. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. आता सिद्धूच्या हातून नकळत घडलेल्या या घटनेचे पुढे जाऊन काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकरी खूश झाले आहेत. “लवकरात लवकर भावना-सिद्धूचं लग्न व्हावं” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत. हा विशेष भाग १७ एप्रिलला रात्री ८ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.