Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत व जान्हवी या जोडीची सर्वत्र प्रचंड चर्चा असते. थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यावर जयंत-जान्हवी सुखाने संसार करतील अशी चाहत्यांना अपेक्षा असते पण, प्रत्यक्षात मात्र जान्हवीच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं असतं.
जयंत अतिशय विकृत नवरा असतो. बायकोने मित्रांशी बोलणं, अगदी माहेरच्या लोकांच्या संपर्कात राहणं देखील जयंतला आवडत नसतं. श्रीनिवासचा ( जान्हवीचे वडील ) अपघात झाल्यावर जान्हवी प्रचंड अस्वस्थ होते हे देखील जयंतला पटत नाही. तो स्वत:च्या हातात काचेचा ग्लास फोडतो जेणेकरून जान्हवीचं त्याला सोडून माहेरी राहणार नाही. आता मालिकेत जयंतची विकृती दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.
जान्हवी माहेरी जाऊ नये म्हणून तो तिला घरात कोंडून देखील ठेवतो. हळुहळू जयंतचा विकृतपणा जान्हवीसमोर देखील येऊ लागला आहे. पण, ती बिचारी सगळं मुकाट्याने सहन करत असते. अशातच आता जान्हवी-जयंतच्या घरी तिची मोठी बहीण मंगला जाणार आहे.
मंगला अचानक जान्हवीला भेटण्यासाठी जयंतच्या घरी जाते. जयंतच्या घराला डिजिटल लॉक असतं. मंगलाला याबद्दल काहीच माहिती नसतं, त्यामुळे ती डिजिटल लॉकवरचे कोणतेही नंबर दाबते. यानंतर घरातील सायरन वाजतो आणि मंगलाचं तोंड दाबून तिला कोणीतरी मागच्या मागे घेऊन जातं. या व्यक्तीचा चेहरा प्रोमोत पाहायला मिळत नाही. पण, दुसरीकडे जयंतच्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज दिसत असल्याने मंगला घरी आल्याचं त्याला समजलेलं असतं.
मंगला तिचं तोंड दाबल्यावर जोरजोरात “जानू-जानू…” म्हणून ओरडू लागते. जान्हवीला काय घडतंय याचा थोडाफार अंदाज येतो आणि ती सुद्धा दरवाजाकडे येऊन रडू लागते. मंगला कशीबशी त्या घरातून निसटून रडत-रडत थेट ‘लक्ष्मी निवास’मध्ये येते.
हतबल झालेली मंगला रडून लक्ष्मीला म्हणते, “मारलं गं, आई मला मारलं… आई अगं तुझी जानू पण अशीच मरणार” थोरल्या लेकीचं बोलणं ऐकून लक्ष्मीला धक्का बसतो. ती श्रीनिवासला घेऊन तातडीने जान्हवीच्या घरी जायचं ठरवते.
आता मालिकेत लक्ष्मी आणि निवाससमोर जयंतचं सत्य येणार का? जान्हवी तिच्या आई-वडिलांना भेटू शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. येत्या २३ आणि २४ मार्चला रात्री आठ वाजता हा विशेष भाग प्रसारित करण्यात येणार आहे.