Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत गुढीपाडव्याच्या दिवशी जयंत जान्हवीची माफी मागून एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असल्याचा सीक्वेन्स पाहायला मिळाला. मात्र, विकृत जयंत काही केल्या सुधारणार नाहीये. चांगलं वागण्याचं नाटक करून जयंत आता पुन्हा एकदा जान्हवीला त्रास देण्यास सुरुवात करणार आहे असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

लग्न झाल्यापासून जयंत जान्हवीशी विचित्र वागत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा जयंत कधी बायकोसमोर झुरळ खातो, तर कधी तिचा फोन बंद करून २४ तास तिच्यावर नजर ठेवून असतो. काही दिवसांपूर्वी प्रेम सिद्ध करण्यासाठी जयंतने जान्हवीला झुरळ टाकलेलं दूध पिण्यासाठी जबरदस्ती केली होती. यानंतर जान्हवीचे आई-बाबा अचानक तिला भेटण्यासाठी जयंतच्या घरी येतात आणि ती २ दिवस आनंदात असते.

आपल्या बायकोने माहेरच्या लोकांशी हसुन-खेळून बोलणं, दोन दिवस एवढं आनंदी राहणं… हे देखील जयंतला आवडलेलं नसतं. या सगळ्यात तो गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जान्हवीला चांगलं वागण्याचं वचन देतो. पण, विकृत जयंत हे वचन काही दिवसही पाळत नाही. आता तो पुन्हा एकदा बायकोला अजब शिक्षा देऊन त्याचं विचित्र रुप दाखवणार आहे.

जान्हवीच्या घरचे आल्यामुळे २ दिवस बायको आपल्यापासून दुरावली, असा विचार करून जान्हवीचा हात आणि स्वत:चा हात तो एका कपड्याने घट्ट बांधतो. जान्हवीला जराही दूर जाऊ द्यायचं नाही या विचाराने जयंत तिला स्वत:च्या हाताला बांधून ठेवतो. “ही गाठ सोड, मला प्रचंड दुखतंय” अशी विनवणी जान्हवी करत असते पण, तरीही जयंत काही केल्या ऐकत नाही. ही अजब शिक्षा पाहून जान्हवीला अश्रू अनावर होतात, तिला या सगळ्याचा भयंकर त्रास होतो आणि यामुळेच आता ती मोठा निर्णय घेणार आहे.

जान्हवी जयंतचं घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार आहे. ती मनातल्या मनात विचार करते, “आज मी या घरातून माझी सुटका केल्याशिवाय राहणार नाही. आज जयंत तू जेव्हा घरी परत येशील ना…तेव्हा ही जान्हवी तुझ्या नजरेच्या टप्प्यात कुठेच नसेल.”

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा भाग २ आणि ३ एप्रिलला रात्री आठ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.