Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जयंत काही केल्या सुधारत नाहीये. तो दिवसरात्र जान्हवीला आपल्या ताब्यात कसं ठेवता येईल याचा विचार करत असतो. नुकतेच जयंतच्या घरी जान्हवीच्या माहेरचे लोक राहायला आल्याचं पाहायला मिळालं होतं. जान्हवीचे आई-बाबा असे अचानक घरी आले ही गोष्ट जयंतला अजिबात आवडली नव्हती.

जान्हवी यानंतर आपल्या कुटुंबीयांचा पाहुणचार करते आणि दोन दिवस लेकीकडे राहिल्यावर लक्ष्मी व श्रीनिवास लाडक्या जानूचा निरोप घेऊन घरी येतात. यानंतर जयंत, चुकीचं वागल्याबद्दल जान्हवीची माफी मागतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन संकल्प केल्यामुळे जयंतमध्ये सुधारणा होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असते पण, घडतं काहीतरी वेगळंच… बायकोची माफी मागितल्यावर दुसऱ्याच दिवशी जयंत पुन्हा आधीसारखं वागू लागतो. त्याचा स्वभाव अजिबात बदलत नाही. याउलट यावेळी तो जान्हवीला वेगळीच त्रासदायक शिक्षा देतो.

जान्हवी तिचे आई-बाबा आल्याने दोन दिवस आपल्यापासून दूर होती हा विचार करून जयंत बायकोचा हात आपल्या हाताला घट्ट बांधून ठेवतो. यामुळे जान्हवीला धड कोणतंच काम करता येत नाही. तिला प्रचंड वेदना होतात आणि या त्रासाला कंटाळून जान्हवी जयंतच्या घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते. जयंत ऑफिसला गेल्यावर घराबाहेर पडायचं असं जान्हवी मनातल्या मनात ठरवते.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी गच्चीचं टाळं तोडून बाहेर येते आणि गच्चीवरून खाली उतरते. म्हणजेच जयंतच्या घरून पळ काढण्यात जान्हवीला यश आल्याचं पाहायला मिळत आहे.

यावेळी जान्हवी तिचा साडीतील लूक देखील बदलते. ती मस्त ड्रेस घालते…आधीसारखी रस्त्यावर वावरते. पाणीपुरी खाते, आइस्क्रीमचा आस्वाद घेते आणि शेवटी एकटीच बसून मनसोक्तपणे गाणं गुणगुणत बसते. एवढ्यात एका खास व्यक्ती एन्ट्री होती. जान्हवीला विश्वाच्या आयुष्यात आलेली सई भेटणार आहे. आता सई आणि जानू एकमेकींना भेटल्यावर विश्वाशी तिची भेट होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दुसरीकडे, श्रीनिवासने नोकरी गेल्यामुळे रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आता श्रीनिवास आणि जान्हवीचं नशीब त्यांना नेमकं कुठे घेऊन जाणार? हे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत ३, ४ आणि ५ एप्रिलला रात्री ८ वाजता पाहायला मिळेल.