Zee Marathi Lakshmi Niwas Serial : ‘लक्ष्मी-निवास’ मालिकेत सध्या सगळे दळवी कुटुंबीय मिळून श्रीनिवासचा वाढदिवस साजरा करत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. यादरम्यान, सासरेबुवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जयंत देखील सासुरवाडीत पोहोचतो. जान्हवी तिच्या आई-बाबांना व घरातील इतर भावंडांना भेटून प्रचंड आनंदी होते. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून जयंत श्रीनिवासच्या नावावर कंपनीचा १५ टक्के हिस्सा करतो. पण, हे एवढं मोठं गिफ्ट लक्ष्मी आणि श्रीनिवास नाकारतात.

श्रीनिवासने गिफ्ट नाकारल्यावर त्याचा थोरला मुलगा संतोष प्रचंड संतापतो आणि वडिलांचा सर्वांसमोर अपमान करतो. हे लक्ष्मीला अजिबात सहन होत नाही. आता ती पुढाकार घेऊन नवऱ्याची बाजू घेणार आहे एवढंच नव्हे तर, लक्ष्मी तिच्या मुलांना खडेबोल सुनावणार आहे. सगळं काही आनंदात सुरू असताना जान्हवीची आजी नातीकडे, “जयंत तुझ्याशी नीट वागतोय का?” याची चौकशी करते. हे बोलणं जयंत चोरून ऐकतो आणि आजीला धडा शिकवण्याचे विचार त्याच्या डोक्यात फिरू लागतात.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून जयंत जान्हवीशी एकदम प्रेमाने वागत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. दरवेळी बायकोला नवनवीन शिक्षा देणाऱ्या जयंतमध्ये गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक बदल झालेला आहे. पण, हे नव्याचे नऊ दिवस फार काळ टिकणार नाहीयेत. जयंत पुन्हा एकदा जान्हवीला त्याचा खरा रंग दाखवणार आहे. घरात असं काही घडणार आहे, की त्याबदल्यात जयंत जान्हवीला मोठी शिक्षा देण्याची शक्यता आहे.

जान्हवीचा कॉलेजचा मित्र विनोद अचानक जयंतच्या घरी येऊन पोहोचतो. त्याच्या पायाला दुखापत झालेली असते. अस्वस्थ झालेली जानू म्हणते, “तू इथे का आलास आता केव्हाही माझा नवरा इथे येईल.” यावर विनोद त्याच्यामागे पोलीस लागल्याचं सांगतो. जयंतच्या मागोमाग पोलीस देखील चौकशीसाठी त्याच्या घरी येतात. पण, विनोद आधीच लपून बसलेला असतो.

जयंतकडे संपूर्ण घराचं सीसीटीव्ही फुटेज २४ तास सुरू असतं ही गोष्ट जान्हवीला माहिती नसते. पोलीस गेल्यावर जयंत दार बंद करतो आणि सर्वात आधी रागात विनोदला शोधून काढत त्याला मारहाण करतो. यानंतर भडकलेला जयंत जान्हवीला हाक मारतो. जयंतचे हे रुप पाहून जानू प्रचंड घाबरते…तिला काय बोलावं हे सुद्धा सुचत नसतं. आता जानू नवऱ्याला कशी समोरी जाणार…जयंत अत्यंत पझेसिव्ह असल्याने तो घरात नसल्यावर विनोदचं घरी येणं या गोष्टीकडे तो कोणत्या नजरेतून पाहणार असे सगळे विचार प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या मनात सुरू आहेत.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या २६ आणि २७ एप्रिलला रात्री आठ ते नऊ या वेळेत प्रसारित केला जाणार आहे. आता जयंत जान्हवीला कोणती शिक्षा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.