‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंतचं विचित्र वागणं दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. बायकोवर अविश्वास दाखवणं, तिला माहेरच्या लोकांशी बोलण्यास विरोध करणं, संशय घेणं, जान्हवीला सतत वेगवेगळ्या शिक्षा करणं…एकंदर लग्नानंतर हसतखेळत जगणाऱ्या जान्हवीचं आयुष्य संपूर्णपणे बदलून गेलं आहे. या सगळ्या गोष्टी जान्हवीने तिच्या आईपासून लपवून ठेवलेल्या असतात.
जान्हवी तिच्या कॉलेजमधल्या सगळ्यांशी प्रेमाने वागत असते. अनेकांना तिने टोपणनावं ठेवलेली असतात. विश्वाला ती प्रेमाने ‘मॅड’ म्हणत असते. या गोष्टी जयंतला अजिबात पटत नाहीत. तो चिडून जान्हवीला या बदल्यात शिक्षा करायचं ठरवतो. जान्हवीला दोन्ही हात वर घेऊन तो गुडघ्यावर बसायला लावतो. पण, तिचं दु:ख पाहून तो स्वतःलाही शिक्षा करतो. याशिवाय तो जान्हवीचा फोन देखील चेक करतो.
जान्हवीने तिच्या फोनमधून विश्वाला अनेक व्हॉइस नोट्स पाठवलेल्या असतात. या सगळ्या व्हॉइस नोट्स जयंत आपल्या फोनवर ट्रान्सफर करून घेतो. ऑफिसमध्ये गेल्यावर तो सगलं रेकॉर्डिंग ऐकतो. विश्वाने जान्हवीला दिलेल्या उत्तरांवरून जयंत या निष्कर्षावर पोहोचतो की, जान्हवीने हे लग्न फक्त आणि फक्त विश्वाच्या आग्रहाखातर केलं आहे. पुढे, जयंत या ‘मॅड’ विषयी अधिक माहिती गोळा करतो. आता दिवसेंदिवस जयंतचा संशय आणि यातून निर्माण होणारे गैरसमज वाढत जाणार आहेत.
जयंत विश्वाच्या मागावर जाणार आहे. त्याचा पाठलाग करत असताना जयंत एका दुकानात पोहोचतो, जिथे जान्हवीचं गाणं वाजत असतं, तिचा गोड आवाज ऐकून जयंत आणि विश्वा दोघंही भारावून जातात. पुढे मात्र, जयंत चुकून विश्वा समजून दुसऱ्याच माणसाचा पाठलाग करतो आणि त्याला मारहाण करतो.
विश्वाला मारहाण केल्याच्या आनंदात जयंत येतो आणि जान्हवीबरोबर डिनर प्लॅन करतो. ते दोघं काही रोमँटिक क्षण शेअर करतात. एकीकडे जान्हवीच्या आयुष्यात या सगळ्या घडामोडी घडत असताना, दुसरीकडे भावनावर लग्न करण्यासाठीचा दबाव असतो. यासाठी भावना गाडेपाटील यांच्याशी चर्चा करते. गाडेपाटीलच सिद्धू आहे हे भावनाल माहिती नसतं. ती त्याला सांगते, तिचं संपूर्ण आयुष्य आनंदीभोवती फिरतं आणि तिच्या आयुष्यात दुसऱ्या प्रेमाला जागा नाही. हे ऐकून सिद्धू अस्वस्थ होतो.
दरम्यान, जयंतला आपलं घड्याळ हरवल्याचं लक्षात आल्यावर, जिथे मारहाण केली तिथे परत जाण्याचा निर्णय जयंत घेतो आणि तिथे गेल्यावर असा काही घडत जे पाहून प्रेक्षक हादरणार आहेत. आता ते नेमकं काय असेल याचा उलगडा मालिकेत लवकरच होईल. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिका दररोज रात्री ८ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.