Lakshmi Niwas : ‘झी मराठी’च्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या जयंतचा विकृतपणा दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नानंतर जयंतने जान्हवीवर हळुहळू सगळे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. जान्हवीने आपल्या माहेरच्या लोकांशी संपर्क साधू नये यासाठी जयंतने तिचा फोन देखील बंद करून ठेवलेला असतो.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच जान्हवीच्या वडिलांचा म्हणजेच श्रीनिवासचा अपघात होतो. यानंतर आपल्या बाबांजवळ थांबण्याची जान्हवीची प्रचंड इच्छा असते. पण, काही केल्या बायकोला माहेरी जाऊ द्यायचं नाही या निर्णयावर जयंत ठाम असतो. यासाठी तो स्वत:ला दुखापत करून घेतो, जेणेकरून त्याच्या काळजीपोटी जान्हवी कुठेच जाणार नाही. याशिवाय जान्हवीला घरातही कोंडून ठेवतो. या सगळ्या गोष्टी ती कोणालाच सांगत नाही.

जयंतच्या घरी फक्त पैशांच्या आशेने तिची मोठी बहीण मंगला आल्याचा सीन नुकताच मालिकेत दाखवण्यात आला. मंगला घराबाहेर उभी असल्याचं जयंत सीसीटीव्हीमध्ये पाहतो. लगेच तो सुरक्षा रक्षकांना फोन करून मंगलाला ताब्यात घ्या असं सांगतो. यानंतर मंगलाचं तोंड दाबून तिला एका अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवण्यात येतं. तिथून सुटका करून मंगला कशीबशी लक्ष्मी निवासकडे पोहोचून आपल्या आई-बाबांजवळ जान्हवीच्या नवऱ्याची तक्रार करणार आहे.

आता या सगळ्यात जान्हवीची एक मोठी परीक्षा जयंत घेणार आहे. लग्नानंतर जान्हवीच्या साडीवर चढलेलं झुरळ जयंतने खाल्लं होतं असा सीन मालिकेत पाहायला मिळाला होता. आता जयंत त्याच्या लाडक्या जानूला तिचं प्रेम सिद्ध करण्यासाठी झुरळ खाण्याची शिक्षा देणार आहे.

जयंत एका हातात दुधाचा ग्लास आणि दुसऱ्या हातात झुरळ घेऊन उभा असतो. हे पाहून जान्हवी म्हणते, “जयंत प्लीज फेकून दे झुरळ…मला खरंच खूप भीती वाटतेय.” यावर जयंत तिला, “मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की, तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना?” असा प्रश्न विचारतो. जान्हवी घाबरत म्हणते, “मी म्हटलं ना तुला? माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे.” जयंत पुढे तिला सांगताो, “असं नाही जानू…त्यासाठी तुला हे झुरळ दुधात घालून हे दूध प्यावं लागेल.”

जयंत हट्टाला पेटून जान्हवीला ते दूध प्यायला भाग पाडत असतो. हे सगळं पाहून जान्हवी प्रचंड घाबरणार आहे. मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “जयंतला या मालिकेतून काढून टाका”, “जयंत सोडल्यास ही मालिका चांगली आहे”, “हा जयंत किती फालतू दाखवलाय” “याला प्रेम म्हणत नाहीत”, “हे प्रकरण आता भरकटत चाललंय” अशा असंख्य कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

lakshmi niwas
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Lakshmi Niwas )

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री ८ ते ९ यावेळेत एक तास प्रसारित केली जाते. या मालिकेला सध्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.