Zee Marathi Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या श्रीनिवासची नोकरी गेल्याचं सत्य लक्ष्मीसमोर आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच श्रीनिवासची नोकरी गेली. यानंतर त्याने अनेक ठिकाणी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण, शेवटी रिक्षा चालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

श्रीनिवास रिक्षा चालवतोय ही गोष्ट एवढे दिवस दळवी कुटुंबातील कुणालाच माहिती नसते. मात्र, लक्ष्मीला नवऱ्याच्या वागण्याबोलण्यातील बदल जाणवत असतो. ती नवऱ्यासाठी दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन जाते. पण, श्रीनिवासला नेमकं ताक द्यायला विसरते. लक्ष्मी ताक देण्यासाठी पुन्हा येते इतक्यात श्रीनिवास रिक्षा चालकाचा गणवेश घालून रिक्षा चालवण्याची तयारी करत असल्याचं तिला पाहायला मिळतं.

श्रीनिवास रिक्षा चालवतोय हे पाहून लक्ष्मीला प्रचंड धक्का बसतो. ती प्रचंड भावुक होते आणि तशीच घरी जाते. घरी आल्यावर लक्ष्मीचं कशातच लक्ष लागत नसतं. श्रीनिवास रिक्षा चालवत असल्याचं सत्य कोणालाही सांगत नाही. आता लवकरच हे सत्य सिद्धूसमोर येणार आहे. याशिवाय मालिकेत श्रीनिवासचा दणक्यात वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

दळवी कुटुंबीय श्रीनिवासच्या वाढदिवसासाठी खास तयारी करणार आहे. घरगुती पद्धतीने व आपल्या माणसांच्या साथीने श्रीनिवास यंदा त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. सासरेबुवांच्या वाढदिवसाला जयंत सुद्धा आवर्जून उपस्थित राहणार आहे. तो म्हणतो, “या कार्यक्रमाला आणखी स्पेशल बनवण्यासाठी मी तुमच्यासाठी एक गिप्ट आणलंय.” जयंत त्याच्या कंपनीतला १५ टक्के हिस्सा श्रीनिवासच्या नावावर करण्याचा निर्णय घेतो.

जयंतने दिलेलं हे मोठं गिफ्ट पाहून श्रीनिवास भारावून जातो. पण, अतिशय नम्रपणे हे गिफ्ट मी स्वीकारू शकत नाही असं तो आपल्या जावयाला सांगतो. श्रीनिवासने गिफ्ट नाकारणं…ही गोष्ट त्याच्या दोन्ही मुलांना पटत नाही आणि घरात एक नवीन वाद सुरू होतो.

संतोष आणि हरिश श्रीनिवासकडे जयंतने दिलेलं गिफ्ट स्वीकारण्याचा हट्ट घरतात. पण, श्रीनिवास शेवटपर्यंत या गोष्टीला नकार देतो. शेवटी, चिडलेला संतोष म्हणतो, “यांचं नेहमीचं झालंय…हे नेहमीच असं वागतात. ज्या वाढदिवसाच्या दिवशी काही होतच नसेल. तो वाढदिवस काय कामाचा” मोठ्या भावाचं हे बोलणं ऐकून भावना त्याला अडवण्याचा प्रयत्न करते. पण, संतोष काही केल्या ऐकत नाहीये हे पाहून लक्ष्मी प्रचंड चिडते.

दरम्यान, आता लक्ष्मी दोन्ही मुलांना काय बोलणार? श्रीनिवास रिक्षा चालवत असल्याचं सत्य दळवी कुटुंबीयांसमोर येणार का या गोष्टी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.