Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ ही ‘झी मराठी’वरची महामालिका सध्या जयंतच्या विकृत वागण्यामुळे चर्चेत आली आहे. मालिकेत काही दिवसांपूर्वीच जयंत-जान्हवीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. लग्नानंतर लक्ष्मीची लाडकी लेक सुखात नांदेल अशी सर्वांनाच अपेक्षा असते. पण, लग्न झाल्यावर जान्हवीला जयंतचं एक वेगळं रुप दिसू लागतं.
जान्हवीच्या बाबतीत जयंत भयंकर पझेसिव्ह असतो. बायकोने माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवणं सुद्धा त्याला आवडत नाही. जान्हवी तिच्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे प्रचंड तणावात असते. तिला माहेरी जायचं असतं. पण, जयंत बायकोला माहेरी जाण्यापासून कसं अडवता येईल याचा विचार करत असतो. इतकंच नव्हे तर जान्हवी आणि तिच्या माहेरच्या लोकांचा काहीच संपर्क होऊ नये यासाठी जयंत तिचा फोन देखील बंद करून टाकतो. ही गोष्टी जान्हवीला माहिती नसते, आपल्याला आई-बाबांना एकही फोन करता येत नाहीये या विचाराने जान्हवी अस्वस्थ होते. ती मोबाईलवर व्हॉईस नोट्स पाठवत असते पण, याचा काहीच उपयोग होत नाही.
आता लवकरच जान्हवीला भेटण्यासाठी जयंतच्या घरी तिची मोठी बहीण मंगला जाणार आहे. पण, तिचंही तोंड दरवाजात एका अज्ञाताकडून दाबलं जातं. यावेळी मंगला “जानू जानू…” म्हणून आरडाओरडा करते पण, काहीच फायदा होत नाही. शेवटी मंगला हे सगळं जाऊन लक्ष्मी व श्रीनिवासला सांगणार आहे. आता जान्हवीच्या आई-बाबांसमोर जयंतच्या विकृत वागण्याचं सत्य येईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “आपल्या मुलीचं ज्याच्याशी लग्न लावलं त्या मुलाचं घर माहिती नाही असं दाखवलंय हे शक्य आहे का?”, “सगळ्यात मूर्ख आणि अशिक्षित जान्हवी आहे”, “या जान्हवीने बावळट जयंतला सोडून जावं”, “खूप विचित्र मानसिकता दाखवली आहे”, “लेखकांना कसं सुचतं हे”, “मालिका छान आहे पण हा जयंत आवडत नाही” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत.

दरम्यान, लक्ष्मी आणि निवाससमोर जयंतचं सत्य येणार की नाही? हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.