Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सध्या लक्ष्मी तिची मोठी लेक भावनाचं लग्न ठरवत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. पण, भावना या लग्नासाठी तयार नसते. तिला आनंदीचा सांभाळ करून हसत-खेळत आपलं आयुष्य जगायचं असतं. याबद्दल ती गाडेपाटील यांना फोन करून सांगते. भावना ज्या गाडेपाटलांशी फोनवर बोलतेय तोच खरा सिद्धू आहे हे तिला माहिती नसतं. सिद्धूने जाणून त्याची ओळख लपवलेली असते. भावनाचं लग्न न करण्याचं मत ऐकून सिद्धू नि:शब्द होतो. आता येत्या काळात सिद्धू भावनाला इम्प्रेस करण्यासाठी आणखी प्रयत्न करताना दिसेल.
एकीकडे भावनाचं आयुष्य रुळावर येत असताना दुसरीकडे जान्हवीचं आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून गेलं आहे. जयंत तिला उठता-बसता कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. बायकोने कोणाशी हात मिळवणं, माहेरच्या लोकांशी फोनवर बोलणं यातलं काहीच त्याला आवडत नसतं. अशातच आता मालिकेत जान्हवी आणि जयंत कंपनीतील लोकांनी आयोजित केलेल्या एका पार्टीला गेल्याचं पाहायला मिळालं.
या पार्टीत जान्हवीला तिचा कॉलेजचा मित्र भेटतो. हा मित्र तिला पार्टीत गाणं गाण्याची विनंती करतो. यानंतर जयंतच्या कंपनीतील इतर सहकारी सुद्धा जान्हवीला गाणं गाण्यासाठी आग्रह करतात. सर्वांच्या आग्रहाखातर जान्हवी आपलं गाणं सादर करते. जान्हवीचा सुरेल आवाज ऐकून सगळेजण तिचं कौतुक करत असतात. हे दृश्य पाहून विकृत जयंत त्याच्या हातातील ग्लास फोडतो. घरी येऊन तो जान्हवीला शिक्षा देतो. रात्रभर वारंवार गाणं गायला सांगतो.
गाणं गाताना थकलेल्या जान्हवीला खूप झोप येत असते. ती प्रचंड थकली असल्याचं जयंतला सांगते. यावर तो म्हणतो, “पार्टीमध्ये सगळ्यांनी आग्रह केल्यावर गायलीसच ना?” पुढे, जान्हवी काहीच न बोलता गाणं गायला सुरुवात करते. नवऱ्याचं हे विचित्र वागणं पाहून जान्हवी पुरती हतबल होते.
“जयंत मी काय केलंय? माझं काय चुकलंय” याबद्दल जान्हवी त्याच्याकडे विचारपूस करते. यावर जयंत म्हणतो, “तू जे वागलीयेस ते कुठे बरोबर होतं जानू? मला न विचारता तू सर्वांसमोर गाणं गायलीस…तेच तुझं चुकलंय. तू, तुझं गाणं, तुझा आवाज या सगळ्यावर फक्त माझा हक्क आहे. पण, तू हे सगळं विसरलीस आणि त्या पार्टीत सर्वांसमोर गायलीस. तू प्लीज जा जानू…जा”
रात्रभर गाणं गायल्यावर जान्हवीचा घसा दुखतो. दुसऱ्या दिवशी, सकाळी लक्ष्मी जान्हवीला विचारपूस करण्यासाठी फोन करते. तेव्हा जान्हवीचा आवाज काहीसा अडखळतोय, लेकीचा आवाज नीट येत नाहीये हे लक्ष्मीला जाणवतं. पण, आता जान्हवी आपल्या आईला काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.