Lakshmi Niwas Serial: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या दोन मालिकांचा सध्या महासंगम सुरू आहे. २७ जानेवारीपासून या दोन्ही मालिकांमध्ये भव्य मंगलकार्य पाहायला मिळत आहे. एकाबाजूला किर्लोस्करच्या कुटुंबात आदित्य-अनुष्काच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला दळवी कुटुंबातील जान्हवी-जयंती लग्नबंधनात अडकणार आहे.
‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकांच्या महासंगमामुळे सध्या अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण, यामधील जान्हवी आणि जयंतच्या उखाण्याच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघांनी एकमेकांसाठी जबरदस्त उखाणे घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
नुकताच ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर जान्हवीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जान्हवी उखाणा घेत म्हणाली, “रायगडावर आहे स्वराज्याची राजधानी, ‘लक्ष्मी निवास’च्या लेकीचे जयंतराव होणार धनी.” त्यानंतर जान्हवीने अजून एक उखाणा घेतला आहे. ती म्हणाली, “मंडपात आरास केली सुंदर फुलांची, ‘लक्ष्मी निवास’ची लेक होणार बायको जयंतची.”
तसंच जयंतचे व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये जयंत उखाणा घेत म्हणतो की, कसब्याच्या गणपतीचा पुण्यात असतो मान पहिला, ‘लक्ष्मीच्या निवास’च्या लेकीने माझ्यात स्वतःचा जोडीदार पाहिला. त्यानंतर दुसरा उखाणा घेत जयंत म्हणाला, “दगडू शेठ गणपतीचा आशीर्वाद, आळंदीच्या माऊलीची पुण्याई, जान्हवीसोबत सप्तपदी घेऊन होणार मी ‘लक्ष्मी निवास’चा जावई.”
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?
एकाबाजूला मालिकेत जान्हवी आणि जयंतची लग्नगाठ बांधली जाणार आहे. पण यावेळी दुसऱ्याबाजूला भावनाचं सत्य समजल्यामुळे सिद्धूचं मन तुटणार आहे. त्यामुळे आता भावना-सिद्धूच्या नात्यात पुढे काय घडणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.