Lakshmi Niwas : ‘झी मराठी’वर अलीकडेच सुरू झालेली ‘लक्ष्मी निवास’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत प्रेक्षकांना जयंत आणि जान्हवीचा भव्यदिव्य लग्नसोहळा पाहायला मिळाला होता. पण, लग्नानंतर जयंतचं वेगळं रुप समोर येत असल्याने नेटकरी या कथानकावर काहीसे नाराज झाले आहे. याशिवाय एका लोकप्रिय हिंदी मालिकेची कॉपी केली असा दावा सुद्धा अनेकांनी कमेंट्समध्ये केला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
दोन दिवसांपूर्वी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आणि साधाभोळा, सर्वांना समजून घेणारा जयंत एका वेगळाच रुपात प्रेक्षकांना दिसला. जान्हवीच्या साडीवर चढलेलं झुरळ त्याने मारलं आणि त्यानंतर ते झुरळ दुधात टाकलं. पुढे, जयंत ते दूध पितोय असं या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं. दळवी कुटुंबाचा लाडका जावई अशा वेगळ्या रुपात पाहून नेटकऱ्यांना सुद्धा धक्का बसला. तर, जान्हवी सुद्धा या प्रोमोमध्ये घाबरल्याचं पाहायला मिळालं.
आधी झुरळ खाल्ल्यावर आता हळुहळू मालिकेत जयंतचं वेगळं रुप प्रेक्षकांसमोर येत आहे. येत्या भागात जान्हवीने जयंतसाठी खास डिनर प्लॅन केल्याचं पाहायला मिळेल. जयंत याबद्दल बायकोचं कौतुक करतो पण, इतक्याच त्याचं लक्ष किचनमध्ये असलेल्या खरकट्या भांड्यांवर जातं. तो थेट उठून किचनमध्ये जातो आणि भांडी घासण्यास सुरुवात करतो. हे दृश्य पाहून जान्हवी द्विधा मनस्थितीत पडल्याचं पाहायला मिळतं. पण, त्यानंतर लगेच जान्हवीला जवळ घेऊन दोघेही एकत्र खरकटी भांडी घासत असल्याचं पाहायला मिळतं. हा क्षणात वेगळा वागणारा जयंत लवकरच आणखी विचित्र वागताना दिसेल असा अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये व्यक्त केला आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या प्रोमोवर आणि जयंतचं हे वेगळंच मानसिक विकृती असलेलं रुप पाहून नेटकऱ्यांनी ही मालिका ‘सौभाग्यवती भव:’ची कॉपी वाटतेय असा दावा केला आहे. अशा असंख्य कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत. “जयंतला OCD आहे”, “एक जुनी मालिका होती सौभाग्यवती भव त्याची copy आहे ही मालिका तो सुद्धा असाच करायचा आणि नंतर तिला खूप त्रास देत होता”, “काही प्रेम नाही पुढे सगळं भयानक असणार”, “हिंदी मालिकेची कॉपी आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.
![Lakshmi Niwas](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/jayant_60f4e2.jpg?w=830)
![Lakshmi Niwas](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/jayant-2.jpg?w=830)
दरम्यान, एकीकडे जान्हवीच्या आयुष्यात सगळं काही विचित्र घडत असतानाच दुसरीकडे, भावनाच्या आयुष्यात आता सिद्धूने एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेत आता सिद्धू भावनासमोर आपलं प्रेम कसं व्यक्त करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिका रोज रात्री ८ ते ९ या वेळेत प्रसारित केली जाते.