‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) या मालिकेतील लक्ष्मी व श्रीनिवास यांच्या कुटुंबावर एकापाठोपाठ एक अशी अनेक संकटं येताना दिसत आहेत. श्रीनिवासची नोकरी गेली, त्याचा मोठा अपघात झाला. त्याबरोबरच त्यांची लहान मुलगी जान्हवीवर तिचा नवरा जयंत अनेक बंधने लादत आहे. तिने तिच्या घरच्यांशी बोलू नये यासाठी त्याने घरात जॅमर बसवला आहे. जान्हवीने फक्त त्याच्याशी बोलावे, फक्त त्याच्यासाठी गाणे गायले पाहिजे अशा अनेक गोष्टी जयंत करीत असल्याचे दिसतो. तसेच स्वत:ला दुखापत करून घेणे, झुरळ घातलेले दूध पिणे-जान्हवीला पिण्यासाठी सांगणे अशा विकृत गोष्टी करताना दिसतो. तसेच लक्ष्मी व श्रीनिवास यांची मोठी मुलगी भावनाचे जग सध्या आनंदीभोवती फिरत असल्याचे दिसते. सिद्धू भावनाला न सांगता, आनंदीला शाळेतून घेऊन गेला होता. त्यामुळे भावनाने सिद्धूच्या कानाखाली मारली होती. आता ‘लक्ष्मी निवास’चा एक प्रोमो समोर आला आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, एकीकडे जयंत व जान्हवी गुढी उभारत आहेत. तर दुसरीकडे लक्ष्मीच्या घरी गुढी उभारली जात आहे. गुढी खाली पडत असताना भावना व सिद्धू ती गुढी सावरतात. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सिद्धू भावनाला म्हणतो की, मॅडम तुम्हाला नक्की माझ्याशी बोलायचं आहे ना? त्यावेळी सिद्धूला भावनाने कानाखाली मारल्याचे आठवते. त्यावर भावना म्हणते, “मी तुमच्याशी खरंच खूप चुकीचं वागले. मी तुमच्याशी तसं वागायला नको होतं. तुम्हाला जमलं तर मला माफ करा.” भावनाचे ते शब्द ऐकल्यानंतर सिद्धूच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, गुढीची पूजा केल्यानंतर जयंत जान्हवीला म्हणतो, “सॉरी जान्हवी यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही”, हे ऐकल्यानंतर जान्हवीच्या चेहऱ्यावरदेखील आनंद दिसत आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘राग-रुसवा विसरून, नव्या वर्षाची सुरुवात प्रेमानं होणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी मालिकेवर कमेंट्स करीत मालिकेचे कौतुक केले आहे. “सिद्धू खूप चांगला व गोड मुलगा आहे”, “प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे, ते सर्वच घडताना दिसतंय. पण, कृपया फक्त गुढीपाडवा आहे म्हणून नको, तर कायम, असंच दाखवून प्रेक्षकांचं मन जिंकत राहा”, “सिद्धू खूप छान आहे. तो नेहमी हसत राहतो. जयंतचा काही विश्वास वाटत नाही. जानूला एप्रिल फूल करू शकतो”, “असंच काही सकारात्मक दाखवा. जान्हवी व जयंतची किती जोडी खूप छान आहे.”, “हीच सकारात्मकता हवी आहे”, असे म्हणत मालिकेचे कौतुक केले आहे.

आता या मालिकेत पुढे नेमके काय होणार, जयंत त्याच्या वागण्यात सुधारणा करणार का याबरोबरच सिद्धू व भावना यांच्यामध्ये मैत्री होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.