‘लक्ष्मी निवास’ (Lakshami Niwas) ही मालिका वेगळ्या धाटणीच्या कथानकामुळे चर्चेत असल्याचे दिसते. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. याबरोबरच, मालिकेत घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी, रंजक वळणे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. काही दिवसांपूर्वी जान्हवी जयंतचे लग्न धुमधडाक्यात पार पडले आहे. सिद्धू भावनाच्या प्रेमात पडला असून तो तिच्याशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यासाठी तो वेगवेगळ्या युक्त्या करत असल्याचे पाहायला मिळते. आता श्रीनिवास लक्ष्मीसाठी खास गोष्ट करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

व्हॅलेंटाइन डे ठरणार लक्ष्मी-श्रीनिवाससाठी खास

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, लक्ष्मी श्रीनिवासला सकाळी उठण्यासाठी हाक मारते. लक्ष्मी श्रीनिवासला म्हणते की चला आवरा, कामावर जायचं आहे ना? त्यावर श्रीनिवास लक्ष्मीचा हात हातात घेत तिला म्हणतो की, आज मला दिवसभर तुझ्याबरोबर राहायचं आहे.

पुढे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, श्रीनिवास स्वत: रांगोळी काढतो. त्यानंतर लक्ष्मी डायरीतील एक सुकलेले गुलाबाचे फूल पाहत असलेले दिसत आहे. त्यानंतर श्रीनिवासच्या हातात लक्ष्मी निवास हे नाव असलेली छोटीशी पाटी असल्याचे दिसत आहे. पुढे पाहायला मिळते की, श्रीनिवास प्राजक्ताची फुलांची लक्ष्मीवर उधळण करत आहे. या व्हिडीओमध्ये एक गाणेही ऐकायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, लक्ष्मी श्रीनिवाससाठी आजचा दिवस खास ठरणार..!”, अशी कॅप्शन दिली आहे.

या प्रोमोवर प्रेक्षकांनी हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. याबरोबरच या मालिकेत भावनाच्या भूमिकेत दिसणारी अक्षया देवधरने हर्षदा खानविलकर व तुषार दळवी यांना टॅग करत तुमच्यावर खूप प्रेम आहे अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री साक्षी गांधीने हर्षदा खानविलकर यांना टॅग करीत खूप गोड असे लिहिले आहे. नेटकऱ्यांनीसुद्धा या प्रोमोवर कमेंट केल्याचे दिसत आहे. “किती छान. खरं आहे, प्रेम कधीच म्हातारं होत नाही”, “खूप दिवसांनी अशी मालिका आली आहे, जी बघावीशी वाटते”, “खूप छान”, असे म्हणत नेटकऱ्यांनी मालिकेचे कौतुक केले आहे.

लक्ष्मी व श्रीनिवास यांचा प्रेमविवाह आहे. हा विवाह लक्ष्मीच्या घरच्यांना मान्य नव्हता, याचा लक्ष्मीच्या वडिलांना धक्का बसला. या सगळ्यामुळे लक्ष्मीचा भाऊ प्रेमाविरुद्ध असल्याचे पाहायला मिळते. दुसरीकडे मध्यमवर्गीय कुटुंबातील लक्ष्मी व श्रीनिवास हे आपल्या कुटुंबासह आनंदात राहत असल्याचे पाहायला मिळते. सर्व कुटुंबाला एकत्र जोडून ठेवत एकमेकांना प्रत्येक सुख-दु:खात साथ देण्याची शिकवण वेळोवेळी ते आपल्या वागणुकीतून देत असतात. लक्ष्मी व श्रीनिवास यांच्यात नितांत प्रेम असल्याचे पाहायला मिळते. प्रेमाबरोबरच एकमेकांची काळजी, एकमेकांच्या मतांचा व निर्णयाचा आदर करतात. एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत ते सांभाळून घेतात. सर्व मुलांना प्रेमाने एखादी गोष्ट सांगतात, त्यांची काळजी घेतात. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader