Zee Marathi Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या देवीच्या उत्सवाचा सीक्वेन्स चालू आहे. या उत्सवात अनेक खऱ्या नात्यांचा उलगडा होणार आहे. जान्हवी-जयंत, सई, विश्वा व त्याचे आई-बाबा असे सगळेजण या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत. याशिवाय दळवी आणि गाडेपाटील कुटुंबीय सुद्धा देवीच्या उत्सवाची विशेष तयारी करत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक भावना अन् सिद्धूची लव्हस्टोरी पुढे कशी जाणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर मालिकेत तो क्षण लवकरच पाहायला मिळणार आहे. देवीआईचा आशीर्वाद घेताना सिद्धूला भावनाशी लग्न करण्याचे संकेत मिळणार आहेत. तर, निलांबरीने रचलेल्या कटकारस्थानमुळे सिद्धूच्या लव्हस्टोरीत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

रेणुका गाडेपाटील म्हणजेच सिद्धूची आई त्याच्या वहिनीला ( निलांबरी ) सांगते, “हा शालू आपल्या पूर्वीला नेऊन दे आणि तिला सांग…हा शालू नेसून ये आणि देवीची पूजा कर.” निलांबरी यानंतर एक मोठा कट रचते. भावनाच्या साडीवर जाणूनबुजून पाणी सांडवते आणि तिला सांगते यातली तिसऱ्या नंबरची साडी नेस आणि तिच पूर्वीसाठी दिलेली मानाची साडी असते.

भावना सुद्धा निलांबरीच्या सांगण्याप्रमाणे साडी नेसून बाहेर येते पण, तो गाडेपाटलांच्या घराण्याचा मानाचा शालू आहे ही गोष्ट भावनाला माहिती नसते. भावनाला मानाच्या साडीत पाहून सिद्धूची आई प्रचंड संतापते. रेणुका संतापून भावनाला म्हणते, “हा मानाचा शालू मी माझ्या होणाऱ्या सुनेला नेसायला दिला होता. तुझी हिंमत कशी झाली हा शालू नेसायची…ताबडतोब जा आणि आताच्या आता हा शालू बदलून ये.”

भावना शालू बदलण्यासाठी माघारी जायला निघते. इतक्यात तिला जोगतीण थांबवते आणि सर्वांसमोर सांगते, “पोरी थांब… हेच तुझं नशीब आहे. हा देवीआईचा कौल आहे.” असं तिला सांगते. हे ऐकून लक्ष्मीला अश्रू अनावर होतात. तर, सिद्धू प्रचंड आनंदी होतो.

आता हा प्रसंग घडल्यावर भावना आणि सिद्धूचं मैत्रीचं नातं कोणतं वळण घेणार, दोघांचं लग्न कसं होणार? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. भावना आणि सिद्धूचे चाहते हा भाग पाहण्यासाठी आतुर झाले आहे. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिकेत रात्री ८ वाजता प्रेक्षकांना हा ट्विस्ट पाहायला मिळेल.