Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या श्रीनिवासचा अपघात झाला असून, हळुहळू त्याची प्रकृती सुधारत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. श्रीनिवासचा अपघात झाल्याचं समजताच सगळेजण हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतात. श्रीनिवासला काही करून बरं वाटावं यासाठी लक्ष्मी प्रार्थना करत असते. अखेर नवऱ्याला शुद्ध आल्यावर तिच्या जीवात जीव येतो. यादरम्यान, वडिलांची विचारपूस करण्यासाठी नुकतंच लग्न झालेली जान्हवी सुद्धा रुग्णालयात आलेली असते.

जान्हवी तिच्या बाबांच्या काळजीपोटी प्रचंड रडत असते, हे सगळं जयंतला आवडत नसतं. एवढंच नव्हे तर, आपल्या बायकोने माहेरच्या लोकांशी बोलणं देखील त्याला पटत नसतं. काही करून बायकोला हॉस्पिटलमधून घरी घेऊन जायचं या विचारात जयंत असतो. पण, जान्हवीची मनस्थिती पाहता ती घरी येणार नाही याची जयंतला जाणीव असते. म्हणून, तो एक विकृत डाव खेळतो.

जयंत काचेचा ग्लास स्वत:च्या हातात फोडतो. यामुळे त्याच्या तळहातावर जखम होते. आता जयंतला जखम झाल्याने जान्हवीला सासरी परतणं भाग असतं. ती जयंतबरोबर घरी जाते आणि उद्या सकाळी आपण बाबांकडे पुन्हा जाऊयात असं नवऱ्याला सांगते. जयंत पुन्हा अस्वस्थ होतो, ‘मला लागलंय हे सोडून हिला बाबांची काळजी आहे’ असा विचार करून सकाळी उठल्यावर विकृत जयंत स्वत:च्या हाताला आणखी दुखापत करून घेतो.

जयंतच्या हाताला पुन्हा जखम झाल्याचं पाहून जान्हवी अस्वस्थ होते. ती जयंतला पटकन मलमपट्टी करते आणि रुग्णालयात न जाण्याचा निर्णय घेते. जयंतला औषधं देताना सुद्धा जान्हवीच्या मनात बाबांचा विचार असतो. हे सगळं पाहून चिडलेला जयंत त्याच्या लाडक्या जानूला बेडरुममध्ये लॉक करून निघून जातो.

आता जयंत पुन्हा घरी आल्यावर जान्हवी चांगलीच संतापणार आहे. जान्हवी आपली बॅग वगैरे भरून ठेवते. नवरा आल्यावर ती त्याला सांगते, “दार उघड मी जातेय…” जान्हवी आपल्याला सोडून जातेय हे जयंत सहन करू शकत नाही. तो तिला गुडघ्यावर बसून, ‘प्लीज निघून जाऊ नकोस’ अशी विनंती करू लागतो.

जान्हवी काही केल्या ऐकत नाही. तिच्या निर्णयावर ती ठाम असते. कारण, लग्न झाल्यापासून तिने जयंतची प्रचंड दादागिरी सहन केलेली असते. जयंत तिला म्हणतो, “प्लीज जानू… तुला काय हवंय ते मला सांग, तुला बाबांना भेटायचंय ना? प्लीज, मला सांग मी नेतो तुला खरंच… पण, अशी रागात नको जाऊस” जयंत गुडघ्यावर बसून, हात जोडून जान्हवीची माफी मागतो. आता जान्हवी त्याला माफ करणार की घरातून निघून जाणार? हे येत्या भागात स्पष्ट होईल.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेहमी जयंतचा त्रास मुकाट्याने सहन करणारी जान्हवी पहिल्यांदाच त्याला अद्दल घडवून माफी मागायला लावणार हे पाहून नेटकऱ्यांनी या प्रोमोचं कौतुक केलं आहे. “जानू एक नंबर”, “जयंतच्या जानूने योग्य निर्णय घेतलाय मस्त जान्हवी”, “आता खरी मजा येणार”, “जानू इज बेस्ट” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या प्रोमोवर केल्या आहेत.

Story img Loader