सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यात चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. कलाकारांच्या कामाबद्दल, तसेच त्यांच्या प्रेमी जीवनाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. कलाकारांच्या आयुष्यातील अनेक जोडीदार हे बहुतांश मनोरंजन या क्षेत्रातलेच असतात. अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. त्यापैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas) मालिका फेम प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) आणि तिचे पती केदार वैद्य (Kedar Vaidya).
पल्लवी वैद्य ही टेलिव्हिजन क्षेत्रातली लोकप्रिय अभिनेत्री आहे; तर केदार वैद्यही याच क्षेत्रात प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. केदार वैद्य हे आज दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात कार्यरत असले तरी एकेकाळी त्यांनी पल्लवीच्या सांगण्यावरून स्वत:चं गॅरेज सुरू केलं होतं. त्याबद्दल त्यांनी स्वत: सांगितलं आहे. झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात त्यांनी याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.
त्याबाबत केदार वैद्य यांनी असं सांगितलं, “मी पल्लवीला लग्नासाठी विचारलं तेव्हा पल्लवीनं मला सांगितलं की, आमच्या घरी इंडस्ट्रीमधला चालणार नाही. तर मी म्हटलं का? काय वाईट आहे? मी आता सहायक दिग्दर्शक आहे आणि पुढे जाऊन दिग्दर्शकही होईन. त्यावर ती मला स्वत:चा व्यवसाय असणारा मुलगा हवा, असं ती म्हणाली होती. कारण- तिच्या वडिलांचा व्यवसाय होता. म्हणून मग मी गॅरेज टाकलं होतं.”
त्याबद्दल पुढे ते म्हणाले, “मी हे क्षेत्र सोडून स्वत:चं गॅरेज टाकलं होतं. कुणाकडून तरी कर्ज वगैरे घेऊन ते सुरू केलं होतं. मग मी पल्लवीच्या घरी जायला लागलो आणि एके दिवशी तिच्या वडिलांना भेटलो, ज्यांची पल्लवीनं मला भीती दाखवली होती. त्यांनी मला गॅरेजबद्दल वगैरे विचारलं. मी त्यांना म्हणालो की, नाही हे मी आता सुरू केलं आहे. याआधी मी फिल्म इंडस्ट्रीत होतो. त्यावर ते म्हणाले की, मग काय झालं? का सोडली?”
पुढे केदार यांनी असं म्हटलं, “पल्लवीच्या वडिलांचे हे उत्तर ऐकून मी अवाकच झालो. कारण- तिनंच मला या क्षेत्रातला मुलगा चालणार नाही, असं म्हटलं होतं. पण हिचे बाबा तर आता म्हणतायत की, फिल्म इंडस्ट्री का सोडली? पण तेव्हा गॅरेजमुळे मी खूप कर्जात होतो. माझी पूर्ण वाट लागली होती. मग अखेर गॅरेज बंद झाल्यावर मला पल्लवीनं होकार दिला.”
पल्लवीचे पती केदार वैद्य हे मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक आहेत. ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘झिपऱ्या’ तुझेच मी गीत गात आहे’, ‘अंतरपाट’ यांसारख्या मालिकांचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. ‘अगंबाई अरेच्चा!’ या चित्रपटात त्यांनी सह-दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली होती. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली.