Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ ही ‘झी मराठी’वरची कौटुंबिक मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. अलीकडेच या मालिकेत जान्हवी आणि जयंतचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडला. या मालिकेत हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ला, दिव्या पुगावकर अशा एकापेक्षा एक दमदार कलाकारांची मांदियाळी आहे. आता नुकतीच या मालिकेबद्दल आणखी एक अपडेट समोर आली आहे. ‘लक्ष्मी निवास’मध्ये एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झालेली आहे. ही अभिनेत्री कोण आहे याबद्दल जाणून घेऊयात…
‘लक्ष्मी निवास’ मालिकेचं कथानक मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारलेलं आहे. आपलं हक्काचं घर असावं, आपल्या मुलींची थाटामाटात व चांगल्या घरात लग्न व्हावीत अशी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दाम्पत्याची इच्छा असते. या दोघांचा मालिकेत वेंकी नावाचा मानसपुत्र देखील असतो. त्याचा लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी मिळून सांभाळ केलेला असतो. वेंकीला बोलता येत नसतं. पण, इतकी वर्षे एकत्र राहून त्याच्या मनातील भावना दळवी कुटुंबीयांना ओळखता येत असतात. याच वेंकीच्या आयुष्यात एका ‘फुलराणी’ची एन्ट्री होणार आहे.
वेकींच्या आयुष्यात एन्ट्री घेणाऱ्या फुलराणीची भूमिका अभिनेत्री पायल पांडे साकारणार आहे. या फुलराणीला पाहताच क्षणी वेंकीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तो तिच्याकडे टक लावून पाहतच राहतो. पण, त्यानंतर ही फुलराणी वेंकीवर काहिशी भडकते. अगदी साध्याभोळ्या लूकमध्ये पायल मालिकेत एन्ट्री घेणार आहे.
पायल पांडेबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘गारुड’ सिनेमात झळकली होती. यापूर्वी तिने ‘B.E. Rojgaar’ या सीरिजमध्ये काम केलेलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. याशिवाय पायलने अनेक नाटकांमध्ये देखील काम केलेलं आहे. तिने दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून ( नॅशन स्कूल ऑफ ड्रामा NSD ) नाट्यशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे. मूळची सांगलीची असलेली पायल आता छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास सज्ज झाली आहे.
दरम्यान, पायलच्या येण्याने वेंकीच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका संध्याकाळी ८ ते ९ या एक तासाच्या वेळेत प्रसारित केली जाते.