Zee Marathi Lakshmi Niwas Promo : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या लक्ष्मीला श्रीनिवासच्या वागणुकीत बदल जाणवत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. श्रीनिवासची नोकरी काही दिवसांपूर्वीच जाते, त्यांना वयोमानानुसार नोकरीवरून काढून टाकलं जातं. आता नोकरी गेल्यावर घर कोण चालवणार असा विचार करून हतबल झालेला श्रीनिवास जागोजागी नोकरी शोधत असतो. शेवटी त्याच्यासमोर रिक्षा चावण्याचा पर्याय उरतो.

आपण रिक्षा चालवतोय हे जर लक्ष्मीला समजलं तर, तिला प्रचंड वाईट वाटेल. याची जाणीव श्रीनिवासला असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बायकोपासून लपवून ठेवत तो दिवसभर भरपूर मेहनत करून रिक्षा चालवतो.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मीला श्रीनिवासच्या वागण्या-बोलण्याचा संशय येऊ लागला आहे. नवऱ्याच्या खिशात सापडलेला रिक्षाचा बिल्ला आणि सुटे पैसे पाहून लक्ष्मीला अचानक श्रीनिवासवर संशय येऊ लागतो. खरंतर, यामुळे ती नवऱ्याचा पाठलाग सुद्धा करते पण, ऐनवेळी श्रीनिवास तिला पाहतो आणि वेळ मारून नेतो. पण, आता मालिकेत असं काही घडणार आहे की…लक्ष्मीसमोर श्रीनिवासची नोकरी गेल्याचं सत्य उघड होणार आहे.

जेवणाचा डबा घरीच विसल्यामुळे लक्ष्मी श्रीनिवाससाठी मोठ्या आपुलकीने जेवण घेऊन जाते. पण, याचदरम्यान नवऱ्याला ताक द्यायचं राहिलं ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि ती पुन्हा माघारी येते. लक्ष्मी दुरुन नवऱ्याला पाहते…तेव्हा तिच्या लक्षात येतं की, श्रीनिवास रिक्षाचालकाचा गणवेश घालून रिक्षा चालवण्याची तयारी करत असतो.

श्रीनिवास अशाप्रकारे घरच्यांपासून लपवून मोठ्या मेहनतीने रिक्षा चालवतोय हे पाहून तिच्या हातातलं सगळं सामान खाली पडतं आणि डोळे पाणावतात. लक्ष्मीला नवऱ्याची अवस्था पाहून, त्याने एवढे दिवस मनात लपवलेलं दु:ख पाहून अश्रू अनावर होतात. आता या परिस्थितीचा सामना लक्ष्मी कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग येत्या २० एप्रिलला म्हणजेच रविवारी दुपारी दीड आणि रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे.