Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या सिद्धू भावनाचं मन जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, काही झालं तरी भावना तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम असते. सिद्धूने कोणतीही मदत केलेली, त्याचा पाठलाग करणं यापैकी काहीही भावनाला आवडत नसतं. मात्र, याउलट भावना गाडेपाटलांशी खूप चांगलं बोलत असते. गाडेपाटील म्हणून फोनवर सिद्धूच तिच्याशी बोलतोय हे भावनाला माहिती नसतं.

एकीकडे सिद्धू भावनामध्ये गुंतत जातोय तर, दुसरीकडे गाडेपाटलांच्या घरात सिद्धूसाठी मुलगी पाहण्याची तयारी सुरू असते. अशातच विरोधीपक्षाचे नेते सिद्धूच्या वडिलांबरोबर म्हणजेच संपतराव गाडेपाटलांबरोबर हातमिळवणी करतात. यानंतर त्यांची लेक पूर्वी हिचं स्थळ ते सिद्धूसाठी सुचवतात. गाडेपाटलांना सुद्धा हे स्थळ लेकासाठी मान्य असतं. कारण, पूर्वी आणि सिद्धू हे दोघंही लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात. अर्थात, यामागे सुपर्णा आणि रवी यांचा मोठा डाव असतो. तो डाव काय आहे हे भविष्यात स्पष्ट होणार आहे.

सिद्धू आणि पूर्वीचं लग्न संपतराव गाडेपाटील परस्पर ठरवतात. या गोष्टीपासून सिद्धू अनभिज्ञ असतो आणि याचमुळे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. सिद्धू आणि पूर्वीचा साखरपुडा मालिकेत लवकरच पाहायला मिळेल.

भावना आपली भावी पत्नी होईल हे स्वप्न पाहत असतानाच सिद्धूचा प्रेमभंग होणार आहे. भावनाशी नव्हे तर सिद्धूचा साखरपुडा पूर्वीशी होणार आहे. या पूर्वीची भूमिका मालिकेत जान्हवी तांबट साकारत आहे. यापूर्वी या अभिनेत्रीने ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’, ‘संत गजानन शेगावीचे’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. आता जान्हवी ‘लक्ष्मी निवास’मध्ये पूर्वीच्या भूमिकेत झळकत आहे. पूर्वीच्या येण्याने सिद्धूच्या लव्हस्टोरीत मोठा अडथळा येणार आहे.

सिद्धू पूर्वीबरोबर साखरपुडा होत असताना नाखूश असतो. भावनाला डोळ्यासमोर पाहून त्याला अश्रू अनावर होतात. तर, दुसरीकडे सिद्धू मार्गाला लागतोय हे पाहून भावना मात्र प्रचंड आनंदी असते. लवकरच मालिकेत सिद्धूच्या साखरपुड्याचा ट्विस्ट येणार आहे.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. कारण, सध्या प्रत्येकाला भावना आणि सिद्धूची हटके जोडी पाहायला आवडतेय. त्यांची गोड भांडणं, सिद्धूचं सारखं भावनाच्या मागे फिरणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. “काहीही झालं तरी लग्न भावनाशी होणार” अशा कमेंट्स नेटकरी या प्रोमोवर करत आहेत.