अनेकदा कामाच्या ठिकाणी मुलींना एखाद्या पुरुष सहकाऱ्याकडून त्रास दिला जातो. काही मुली याबाबत तक्रार करतात, तर काही मुली मात्र भीतीने अशा गोष्टी सहन करतात. आता लक्ष्मी निवासच्या नवीन प्रोमोमध्ये असाच सीन पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘लक्ष्मी निवास'(Lakshmi Niwas) या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो आता सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला, भावना ऑफिसमधून घरी आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, भावनाच्या चेहऱ्यावर उदासी असल्याचे दिसत आहे. तिला तसे पाहताच तिची आई म्हणजेच लक्ष्मी तिला विचारते, “भावना काय झालं? अशी भांबावलेली का दिसतेस?” त्यावर भावना तिला म्हणते की, ऑफिसमध्ये कामाचा तणाव, बाकी काही नाही. असे म्हणत भावना तिच्या खोलीत जाते. खोलीत गेल्यानंतर ऑफिसमध्ये घडलेला प्रकार आठवत ती रडते. तिचा बॉस तिला चुकीचा स्पर्श करत असल्याचे आठवत ती रडू लागते. भावनाला रडताना पाहून आनंदी सिद्धूला फोन करते. ती त्याला सांगते की भावना आई रडत आहे. त्यावर सिद्धू तिला म्हणतो, “तू टेन्शन घेऊ नकोस, मी काय करायचं ते बघतो.”
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सिद्धू भावनाच्या ऑफिसमध्ये जातो आणि तिच्या बॉसला मारहाण करतो. प्रोमोच्या शेवटी सिद्धू भावनाच्या बॉसला कॉलरला धरून बाहेर ओढत नेत असल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कमेंट करीत सिद्धूचे कौतुक केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने म्हटले, “कुठल्याही बॉसने असे वागू नये. स्त्रीला बहिणीप्रमाणे वागवा”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सिद्धूसारख्या मुलांची आज खूप गरज आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “अजूनही असले नराधम या जगात आहेत”, याबरोबरच, “शाबास सिद्धू”, “हिरो म्हणजे असाच पाहिजे”, असे म्हणत प्रेक्षकांनी कौतुक केले. तर काहींनी इमोजी शेअर करीत सिद्धूचे कौतुक केल्याचे दिसत आहे.




मालिकेत दाखविल्याप्रमाणे, श्रीकांतचे निधन झाल्यानंतर भावनाने त्याच्या ऑफिसमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर ती नोकरीच्या शोधात होती. काही दिवसांपूर्वीच तिला नवीन नोकरी मिळाली आहे. आता मात्र तिच्या बॉसने तिला त्रास दिल्याचे पाहायला मिळत आहे. सिद्धू भावनाच्या प्रेमात पडला आहे. मात्र, भावनाला तो आवडत नाही. तो भावनाला इंप्रेस करण्यासाठी सतत काही ना काही गोष्टी करत असल्याचे पाहायला मिळाले. याबरोबरच, तो नकळतपणे तिची वेळोवेळी मदत करतानादेखील दिसतो. ज्या आनंदीला भावना मुलगी मानते तिच्याशी देखील सिद्धूची चांगली मैत्री आहे. भावनाच्या आईचा म्हणजेच लक्ष्मीचा तो चांगला मित्र आहे, तर भावनाच्या वहिनीचा तो भाऊ आहे. आता तो भावनाचे मन जिंकण्यात यशस्वी होणार का, भावनाबरोबर घडलेली घटना सिद्धूला आनंदीकडून कळणार की इतर कोणाकडून हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.