Zee Marathi Lakshmi Niwas Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवर २३ डिसेंबरपासून ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत प्रेक्षकांना एकत्र कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळतेय. आपलं हक्काचं घर असावं याचं स्वप्न लक्ष्मी आणि श्रीनिवास यांनी आयुष्यभर पाहिलेलं असतं. मोठं घर बांधण्यासाठी तसेच मुलींची थाटामाटात लग्न करुन देण्यासाठी आता हे जोडपं काय काय मेहनत घेणार, त्यांच्यासमोर काय अडथळे उभे राहतील याचा संपूर्ण प्रवास प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळेल.
सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भावनाचं लग्न मोडल्याचा सीक्वेन्स चालू आहे. ही लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची मोठी मुलगी असते. तिच्या पत्रिकेत दोष असल्याने एवढी वर्षे ती अविवाहित असते. मात्र, ती ज्या कंपनीत कामाला असते…तिथेच तिचं लग्न जमतं. कंपनीचे मालक श्रीकांत इनामदार यांची आई वनजा लग्नाची बोलणी करण्यासाठी दळवी कुटुंबीयांकडे जाते. हे श्रीकांतचं दुसरं लग्न असतं…त्याला लहान मुलगी देखील असते. आनंदीला भावना प्रचंड आवडत असल्याने हे लग्न ठरतं. सगळं काही सुरळीत सुरू असताना रवी म्हणजेच श्रीकांतचा मेहुणा त्यांचा अपघात घडवून आणतो. यामध्ये श्रीकांत आणि वनजाचा मृत्यू होतो. तर, श्रीकांतची लेक आनंदी थोडक्यात वाचते. जगाचा निरोप घेताना वनजा भावनाकडून आनंदीला आयुष्यभर सांभाळण्याचं वचन घेते.
वनजाला दिलेल्या वचनानुसार भावना आई-वडिलांची परवानगी घेऊन आनंदीला ‘लक्ष्मी निवास’मध्ये घेऊन येते. पण, या सगळ्यात आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे. आनंदीला भावनाने स्वत:च्या घरी घेऊन जाणं हे रवी आणि सुपर्णा ( श्रीकांतची बहीण ) यांना रुचलेलं नसतं त्यामुळे याविरोधात ते तिची पोलिसांत तक्रार करतात.
भावनाला पोलीस चौकशीसाठी बोलावतात, यावेळी ते श्रीनिवासला सांगतात, “या मुलीचे वडील वारल्यावर तुम्ही तिला किडनॅप करुन तुमच्या घरी ठेवलंत. या मुलीच्या नातेवाईकांनी या विरोधात तशी तक्रार दिलीये.” दळवी कुटुंबीयांवर आनंदीच्या किडनॅपिंगचा आरोप ठेवला जातो. इतकंच नव्हे तर, आनंदीला भावनाकडे राहायचं हे समजल्यावर पोलीस लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना तुरुंगात टाकतात. याविरोधात भावना पोलिसांना जाब विचारण्याचा प्रयत्न करते. पण, तिला कोणतीही दाद दिली जात नाही. यामुळे तिचे डोळे पाणावतात.
भावनाला काही केल्या चिमुकल्या आनंदीला त्या लोकांकडे ( रवी-सुपर्णा) पाठवायचं नसतं पण, आई-बाबांना सुद्धा तिला जेलमधून सोडवायचं असतं. आता या सगळ्यावर भावना कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका रोज रात्री ८ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाते.